बजेट १ कोटीवर जाणार
By admin | Published: March 3, 2015 09:27 PM2015-03-03T21:27:29+5:302015-03-03T21:56:41+5:30
महिला बालकल्याण समिती सभेत माहिती
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या अंतिम सुधारीत अंदाजपत्रकात १५ लाखांची वाढ होऊन या विभागाचे बजेट सुमारे १ कोटीवर जाणार असल्याची माहिती मंगळवारी समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य वंदना किनळेकर, निकिता तानवडे, श्रावणी नाईक, रुक्मिणी कांदळगावकर, समिती सचिव तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर राष्ट्रपती पदकप्राप्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे चालू आर्थिक वर्षासाठीच्या ८२ लाख ६५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये १५ लाख ४८ हजार रुपयांची वाढ होणार असून एकूण बजेटच्या ५० टक्के निधी विविध प्रशिक्षणे आणि ५० टक्के निधी विविध साहित्य खरेदीवर खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. या विभागाचा निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने विविध प्रशिक्षणार्थींनी आणि योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सभापती स्नेहलता चोरगे यांनी केले. या सभेत सायकल, शिवणयंत्र, सौर कंदिल, वजनकाटा, घरघंटी खरेदीबाबत चर्चा करण्यात आली. तर शासनाच्या दरपत्रकानुसार पुरवठादार ठरवून खरेदी करण्यास सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, यापैकी कोणत्याही पुरवठादाराकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याचे मॉडेल सभागृहात दाखविण्यात आलेले नाही. याबाबत काहींनी शंका उपस्थित करत चांगल्या दर्जाच्या वस्तूंची खरेदी करा, मागाहून तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घ्या अशी सूचना केली. (प्रतिनिधी)
वस्तूच्या वॉरंटीचे काय?
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०११-१२ मध्ये पुरविण्यात आलेल्या शिवणयंत्रांबाबत संबंधित लाभार्थ्यांनी तक्रार दाखल करून ही शिवणयंत्रे निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हटले आहे. तर या शिवणयंत्रांचे सुटे भाग जिल्ह्यात कोठेही मिळत नाहीत किंवा दुरुस्ती करूनही मिळत नसल्याचे म्हटले आहे. तर पुरवठादाराने या शिवणयंत्रासोबत दिलेल्या वॉरंटीकार्डवर आपले नाव, पत्ता, संपर्क नंबर किंवा वॉरंटी कालावधी न लिहिताच आपले साहित्य लाभार्थीच्या माथी मारले. त्याला आता शोधायचे कुठे? असा प्रश्न संबंधित लाभार्थींना पडला असताना आता नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या शिवणयंत्रासह सायकल, घरघंटी, सौर कंदील, घरघंटीसारख्या महागड्या वस्तूच्या वॉरंटीचे काय? त्या नादुरुस्त झाल्यास दुरुस्त कुठे होणार? आणि कोण करणार? याबाबत कोणतीही चर्चा आजच्या सभेत झाली नाही. त्यामुळे मार्चपूर्वी खरेदी होईल. निधीही खर्च होईल पण खरेदी केलेल्या वस्तूच्या वॉरंटीचे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.