अंगणवाड्यांना मिळणार हक्काच्या इमारती
By admin | Published: April 15, 2015 11:17 PM2015-04-15T23:17:04+5:302015-04-16T00:02:34+5:30
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून उपलब्ध
रत्नागिरी : जिल्ह्यातील १७ अंगणवाड्यांच्या इमारतींच्या कामांना मंजुरी मिळाल्याने या अंगणवाड्यांना आता स्वत:च्या मालकीच्या हक्काच्या इमारती मिळणार आहेत, अशी माहिती प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जे. एस. शेख यांनी दिली. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १३६५ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाजमंदिरात भरवण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे़ मात्र, अंगणवाड्या बांधकामासाठी ग्रामीण भागामध्ये जमीनमालक जागा देण्यास तयार होत नसल्याने इमारती कशा बांधणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून उपलब्ध झाला आहे. त्यापैकी सन २०१३-१४ या वित्तीय वर्षामधील अंगणवाडी इमारती बांधकामांना ७८ लाख रुपये इतका निधी मंजूर आहे. उर्वरित रक्कम रुपये २ कोटी ७२ कोटी मधून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ४४ अंगणवाडी इमारत बांधकामांना सप्टेंबर, २०१४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी १७ परिपूर्ण अंगणवाडी इमारत बांधकाम प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रत्येक इमारतीसाठी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती नव्हत्या. मात्र, आता या इमारतींची ग्रामपंचायत स्तरावर ई-टेंडरिंग काढून लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये या अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या हक्काच्या इमारती मिळणारे आहेत. (शहर वार्ताहर)