राज्यात बिल्डर-कॉन्ट्रॅक्टराचं सरकार, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
By अनंत खं.जाधव | Published: September 21, 2023 05:34 PM2023-09-21T17:34:26+5:302023-09-21T17:35:17+5:30
महिला विधेयकला समर्थन पण, निवडणुकी पुरता जुमला नको
सावंतवाडी : राज्यातील सरकार हे गद्दारचे आहे. या सरकारात फक्त गँगस्टर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांचीच कामे होतात. त्यांना सामान्य माणसाचे काही पडले नाही असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ते आरोंदा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ही टिका केली. मी माझ्या महाराष्ट्राच्या घरात चाललो आहे. गुजरात आणि दिल्लीच्या घरात चाललो नाही असा टोला लगावला.
युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे आमदार वैभव नाईक यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. त्याच्या सोबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शैलेश परब, रूपेश राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, बाळा गावडे आदी उपस्थित होते.
निवडणुकी पुरता जुमला नको
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या घरात चाललो आहे. दिल्ली आणि गुजरातच्या घरात चाललो नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच आमचं महिला विधेयकला समर्थन आहे पण हे बिल म्हणजे निवडणुकी पुरता जुमला असू नये अशी टिपण्णी ही ठाकरे यांनी केली.
घटनाबाह्य सरकार किती दिवस चालेल माहित नाही
राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरही ठाकरे यांनी भाष्य केले या मंत्रिमंडळात असे काही मंत्री आहेत की महिलांना शिवीगाळ करतात. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. एका आमदाराच्या मुलावर अपहरणाचा गुन्हा आहे. त्याचे सीसीटीव्हीत पण उपलब्ध आहेत पण कोणतीही कारवाई झाली नाही. तर एका आमदाराने पोलीस स्टेशनला जाऊन गणपती मिरवणुकीत फायरींग केलं. त्याचे बुलेट्स मिळाले अद्याप त्याच्यावरही कारवाई नाही. याच महाराष्ट्रात वारकरी समुदायावर हल्ला होतो. बारसूतील महिलांवर हल्ला होतो हे घटनाबाह्य सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही. मुंबईत झालेल्या मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणावरच्या तपासाबाबत देखील ठाकरेंनी खंत व्यक्त करत सरकारवर सडकून टीका केली.
आमदार अपात्रतेवर बोलताना ते म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी वेळीच याचा निर्णय घ्यायला हवा होता. देशात लोकशाही आहे की नाही हेच कळत नाही, की फक्त हुकूमशाही चालली आहे असाच प्रश्न आम्हाला पडतो. महाराष्ट्रातले हे सरकार गद्दार आणि गँगस्टरचं आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टरच आहे अशी ही टीकाही केली.