बैलाच्या झुंजी अंगलट; आयोजकांवर गुन्हा
By admin | Published: May 28, 2017 11:31 PM2017-05-28T23:31:41+5:302017-05-28T23:31:41+5:30
बैलाच्या झुंजी अंगलट; आयोजकांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : कुडाळ शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर सुरू असलेल्या बैलझुंजीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस विभागाच्या वाचक विभागाने व कुडाळ पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. छापा पडताच बैलझुंजीचे आयोजक, बैलमालक व प्रेक्षकांनी धूम ठोकली. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळावरून तीन बैल व दोन बोलेरो टेम्पो जप्त केले आहेत.
बैलझुंजी घेण्यावर सर्वत्र बंदी असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी बैलझुंजीचे आयोजन होत असतानाच्या घटना ऐकण्यास येत आहेत. रविवारी सकाळी कुडाळ रेल्वेस्थानक मार्गाच्या जवळच्या शेतजमीन परिसरात बैलझुंजीचे आयोजन करण्यात आले होते. झुंजी पाहण्यासाठी शौकीनही जिल्ह्यातूनच नव्हे, तर गोवा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. झुंजीसाठी अनेक ठिकाणांहून बैलांनाही आणण्यात आले होते. काही वेळातच तिथे बैलझुंजी सुरूही झाल्या. दरम्यान, कुडाळ येथे बैलझुंजी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वाचक विभागाच्या पथकाने झुंजी सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांनी कुडाळ पोलिसांनाही सोबत घेत संयुक्तरित्या कारवाई केली. अचानक पडलेल्या छाप्यामुळे आयोजक, बैलमालक आणि प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली. सर्वांनी घटनास्थळावरून वाट मिळेल त्या दिशेने सैरावरा पळ काढला. बैलमालकांनीही आपले बैल व काही वाहनचालकांनी आपली वाहने तिथेच टाकून पलायन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरीहून वाचक विभागाचे पोलीस धाड टाकण्यासाठी घटनास्थळी अगोदर दाखल झाले व नंतर कुडाळ पोलीस दाखल झाले. त्यामुळे या झुंजीबाबत कुडाळ पोलीस अनभिज्ञ होते का, असा सवाल प्राणिमित्रांमधून उपस्थित केला जात होता. याप्रकरणी अधिक तपास कुडाळ पोलीस उपनिरीक्षक संदीप पडेलकर करीत आहेत. तसेच या प्रकरणात अजून बऱ्याच संशयितांची नावेही वाढण्याची शक्यता आहे.