फोंडाघाट हवेलीनगर येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:55 PM2019-07-30T14:55:42+5:302019-07-30T14:56:41+5:30
फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी एलईडी टिव्ही, गॅस शेगडी, प्लास्टिक खुर्च्या, लाकडी टीपॉय, चांदीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांची चोरी केली आहे. ही घरफोडीची घटना त्यांचे भाऊ अशोक सावंत घर साफसफाईसाठी गेले असताना २५ जुलै सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
कणकवली : फोंडाघाट हवेलीनगर येथील सूर्यकांत बाळकृष्ण सावंत यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी एलईडी टिव्ही, गॅस शेगडी, प्लास्टिक खुर्च्या, लाकडी टीपॉय, चांदीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांची चोरी केली आहे. ही घरफोडीची घटना त्यांचे भाऊ अशोक सावंत घर साफसफाईसाठी गेले असताना २५ जुलै सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यकांत सावंत हे सेवानिवृत्त असून गोरेगाव मुंबई येथे राहतात. मूळ गाव फोंडाघाट हवेलीनगर असल्याने ते गावी येणार होते़. तत्पूर्वी त्यांनी घराची साफसफाई करण्यासाठी भाऊ अशोक सावंत यांना कळविले. त्यानुसार २५ जुलै रोजी घराची साफसफाई करण्यासाठी अशोक सावंत त्यांच्या घरी गेले. त्यावेळी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच दरवाजा उघडा होता़. कपाटातील व घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या़. त्यानंतर त्यांनी सूर्यकांत सावंत यांना फोन केला व माहिती दिली.
त्यानुसार सूर्यकांत सावंत शुक्रवारी आपल्या फोंडाघाट येथील घरी आले असता घरातील आठ हजार किंमतीची एलईडी टीव्ही, ८०० रूपयांची गॅस शेगडी, ३०० रूपयांच्या प्लास्टिक खुर्च्या, २ हजार रुपये किंमतीचे लाकडी टेबल, १ हजार रूपयांची चांदीची गणपतीची मूर्ती व रोख ५०० रुपये मिळून १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
पथक कणकवलीत तपासासाठी दाखल
कणकवली शहरातील शिवाजीनगर आणि परबवाडी या दोन भागांत गेल्या दोन दिवसांत १० ठिकाणी चोरी झाली़ या घरफोडीतील चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे़ पुन्हा शुक्रवारी फोंडाघाट येथे चोरी झाली असून चोरीचे सत्र सुरूच आहे़ या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठसे तज्ज्ञांकडून ठिकठिकाणी ठसे घेण्यात आले आहेत़ शुक्रवारी गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक फडणीस यांचे पथक कणकवलीत तपासासाठी दाखल झाले होते़ दिवसभर चोरी झालेल्या ठिकाणी घटनांचा आढावा घेऊन तपासाची दिशा ठरविण्यात येत आहे़