देवगडकडे जाणारी बस रोखली

By admin | Published: December 14, 2015 11:53 PM2015-12-14T23:53:02+5:302015-12-15T00:23:09+5:30

मुणगे येथील प्रवाशास मारहाण : संबंधितांवर कारवाईचे देवगड स्थानकप्रमुखांचे आश्वासन

Bus stopped near Devgad | देवगडकडे जाणारी बस रोखली

देवगडकडे जाणारी बस रोखली

Next

कुणकेश्वर : मुणगे येथील प्रवाशास एस. टी. चालक आणि वाहकाकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणावरुन मुणगे येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी तीन तास बस रोखून धरली. त्यामुळे या मार्गावर या बसने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. देवगड स्थानकप्रमुखांनी चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बस सोडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालवण-देवगड एस. टी. बस क्रमांक (एम. एच. २0 डी. ८२८९) देवगडकडे जाणारी ही देवगड आगाराची बस या बसमधील चालक, वाहकाने प्रवाशास मारहाण केली होती.
देवगड आगारातून १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३0 वाजता सुटलेली देवगड -आचरा ही बस आचरा येथे ६ वाजून १0 मिनिटांनी पोहचली. आचरा येथे बस गेल्यानंतर सुमारे ५0 मिनिटे बस या ठिकाणी उभी राहिली. सायंकाळी ७ वाजता ही बस आचरा येथून मोर्वे येथे जाण्यास निघाली. या दरम्यान मुणगे येथे जाणाऱ्या प्रवाशाने बस उशिरा का सुटली? असे विचारले असता वाहक व प्रवासी यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी चालक दिनेश दुखंडे यांनी आचरा पूलावर बस थांबवून प्रवाशाच्या थोबाडीत मारत बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्या प्रवाशाने ही घटना गावातील ग्रामस्थांना सांगितली.
ही बस मुणगे येथे मालवण येथून सकाळी ९.१0 वाजता आली. त्यावेळी भगवती मंदिर येथे ही बस ग्रामस्थांनी रोखून धरत चालकास मारहाणीबाबत जाब विचारला. तसेच देवगडचे आगारप्रमुख मुणगे येथे येतील त्याचवेळी बस सोडण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तरी सुध्दा चालकाने उध्दटपणा करत आगारप्रमुख रजेवर असल्याचे सांगितले.
आगारप्रमुख रजेवर असल्याने स्थानकप्रमुख एस. एस. वड्डे यांना मुणगे येथे पाठविले. वड्डे यांनी त्या चालकाची चुकी असून त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर तब्बल तीन तासांनी चालकाने माफी मागितल्यानंतर रोखून धरलेली बस ग्रामस्थांनी सोडून दिली. यावेळी ग्रामस्थांनी कोणताही अनुचीत प्रकार केला नाही. या घटनेची तक्रार संबंधित प्रवाशाने देवगड आगारप्रमुख यांच्याकडे दिली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, गोविंद सावंत, दिगंबर पेडणेकर, विश्वास मुणगेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

चालकाचा उद्धटपणा : आगारप्रमुख रजेवर
मालवण-देवगड ही बस मुणगे येथे मालवण येथून सकाळी ९.१0 वाजता आली. त्यावेळी भगवती मंदिर येथे ही बस ग्रामस्थांनी रोखून धरत चालकास मारहाणीबाबत जाब विचारला. तसेच देवगडचे आगारप्रमुख मुणगे येथे येतील त्याचवेळी बस सोडण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तरी सुध्दा चालकाने उद्धटपणा करत आगारप्रमुख रजेवर असल्याचे सांगितले.

Web Title: Bus stopped near Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.