व्यापाºयांचा आक्षेप धुडकावत बांदा येथे खव्याची पोती नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:44 PM2017-08-30T23:44:54+5:302017-08-30T23:44:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : बांदा येथील दोन बेकरींमधून शनिवारी (२६ आॅगस्टला) मोठ्या प्रमाणात खवा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी अन्नभेसळ प्रशासनाने या खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर जप्त केलेली पोती बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमिनीत पुरण्यात आली. तसेच तो खवा नष्ट करण्यात आला. मात्र, याला त्या बेकरी मालकांबरोबरच बांदा व्यापारी संघाने आक्षेप घेतला. यावेळी अधिकाºयांनी व्यापारी संघाच्या पदाधिकाºयांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आपली कार्यवाही पूर्ण केली.
पेढ्यामध्ये वापरण्यात येणाºया खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे दिसून आल्याने सर्व ठिकाणी मिठाईच्या दुकानात झाडाझडती सुरू आहे. तर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी दोन कारमधून बनावट खवा पकडला होता. शनिवारी बांदा येथे पोलिसांच्या पथकाने सोळंकी आणि पटेल यांच्याकडून ७२ हजार रुपये किमतीचा ४५० किलो खवा जप्त केला होता. त्यामुळे बांदा येथे एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, मंगळवारी अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी या जप्त खव्याचे नमुने घेत पडताळणीसाठी पाठविले. या जप्त खव्याची विल्हेवाट लावण्यासाठी या विभागाचे अधिकारी व्यंकटेश वेदपाठक व वर्षा खरात हे बुधवारी दुपारी बांदा पोलीस ठाण्यात दाखल झाले.
दरम्यान, हा जप्त खवा जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीच्या सहायाने खड्डा मारण्यात आला होता. आपला जप्त खवा जमिनीत पुरला जाणार आहे, हे लक्षात येताच या बेकरी मालकांनी बांदा व्यापारी संघाकडे धाव घेत आपले नुकसान होत असल्याची कैफियत मांडली. बांदा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अभय सातार्डेकर, सचिव सचिन नाटेकर, सिद्धेश महाजन, संदेश पावसकर, आदींनी बांदा पोलीस ठाण्यात जात अधिकाºयांशी चर्चा करीत या बेकरी मालकांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.
व्यापारी संघाचा आक्षेप आणि माघार
यावेळी वेदपाठक यांनी प्रथमदर्शनी हा खवा नसून, बर्फीसदृश गोड पदार्थ असल्याचे दिसून येत आहे. हा पदार्थ बनविला कुठे? कधी बनविला? हा किती महिने वापरण्यासाठी योग्य आहे? हे प्रश्न अनुत्तरित असून, या पिशव्यांवर बॅच नंबरही नसल्याचे व्यापारी संघाच्या निदर्शनास आणून दिले. असे हे पदार्थ लोकांच्या जीविताला अपायकारक असल्याने ते आम्ही परत देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे दफन करणेच आमच्या नियमात बसत असून, तुम्ही हवी तर या पिशव्यांची खात्री करू शकता, अशी सूचना व्यापारी संघाला केली होती. या पिशव्यांची खात्री करण्यात आली असता त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅच अथवा हवी असलेली माहिती दिसून आली नाही. त्यामुळे अखेर व्यापारी संघाने माघार घेतली.