डोर्लेतील अपहरण नाट्याचा पर्दाफाश
By admin | Published: June 28, 2015 10:36 PM2015-06-28T22:36:02+5:302015-06-29T00:38:42+5:30
सूत्रधारासह पाच जणांना पोलिसांनी केली अटक
रत्नागिरी : आर्थिक देवघेवीतून डोर्ले येथील प्रसाद हळदवणेकर यांचे शिवारआंबेरे येथून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. अपहरणकर्त्यांनी हळदवणेकर यांच्याकडील एक मोबाईल काढून घेतला. मात्र, दुसरा मोबाईल तसाच राहिल्याने हळदवणेकर यांनी घरी पत्नीला फोन करून अपहरणाची माहिती दिली व ठिकाण कळवल्याने अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी मोहीम राबवल्यानंतर पाच अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
हळदवणेकर यांच्या अपहरण नाट्यामुळे पावस परिसरात खळबळ उडाली होती. डोर्ले येथील प्रसाद हळदवणेकर यांनी व्यवसायाकरिता संजय गांधी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. या सर्व व्यवहारात चोरवणे, राववाडी येथील सदानंद शंकर कांबळे हा मध्यस्थ होता. हळदवणेकर यांच्याकडून दिलेली रक्कम परत न मिळाल्यामुळे कांबळे याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने २५ जूनला सायंकाळी ६ वाजता शिवारआंबेरे कातळवाडी येथून हळदवणेकरचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
ज्या फार्म हाऊसवर प्रसादला डांबून ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणची माहिती प्रसाद यांनी रात्री फोन करुन पत्नीला दिली. पत्नीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी रात्री कांबळे यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकून हळदवणेकर यांना सोडवण्यात आले व पहारेकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रसादला अन्यत्र नेण्यासंदर्भात साथीदारांना कांबळेचा फोन आला. मात्र, त्याचवेळी ते साथीदार पोलीस ठाण्यात होते. त्यामुळे कांबळे जाळ्यात अडकला. पोलिसांनी सदानंद कांबळे, सुनील देसाई, अंबाजी भोंडे, श्रीकांत जंगम, राजेंद्र जंगम यांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले. (प्रतिनिधी)