परप्रांतीय वाळू कामगारांकडून होणाऱ्या वीज चोरीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:27 PM2019-06-01T18:27:24+5:302019-06-01T18:29:23+5:30
आचरा : कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी कालावल हुरासवाडी येथे झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये मुख्य ...
आचरा : कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी कालावल हुरासवाडी येथे झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्यांमध्ये मुख्य लाईनला सुमारे सात ठिकाणी हूक टाकून वीजेचा वापर केला जात होता. ही बाब वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्यावर त्यांनी धडक कारवाई करत विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले.
वीजचोरी करून वापरण्यात आलेल्या वीजेप्रमाणे संबंधितांना वीज बिल दिले जाणार असून ते न भरल्यास जमीन मालकावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वीज कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन केले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आले असून खाडी किनारी झोपड्या उभारुन तेथे राहत आहेत. कालावल धामणे कलम बागेत सुमारे दहा ते बारा झोपड्या उभ्या केल्या असून आंबा कलमांच्यावरून गेलेल्या विद्युत लाईनला हूक टाकून वीज चोरी केली जात असल्याची माहिती वीज कंपनीला समजताच कनिष्ठ अभियंता मुगडे, सहाय्यक अभियंता सोनाली माने, कर्मचारी पिंटो साळकर, अल्पेश मोडक, नाईक फोरमन आदींनी धाव घेत लाईनला टाकलेला हूक काढून घेत विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले १०० वॅट चे बल्ब, एलीडी बल्ब, वायर आदी सामान जप्त करण्यात आले.
या कारवाईवेळी वायंगणी सरपंच संजना रेडकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदीं उपस्थित होते. या प्रकरणात वीज बिल न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
उभारलेल्या झोपड्या अनधिकृत : रेडकर
कालावल खाडी पात्रातील वाळू उत्खनन करण्यास आलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी झोपड्या उभारण्याबाबत वायंगणी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याची माहिती या कारवाई दरम्यान उपस्थित झालेल्या वायंगणी सरपंच संजना रेडकर यांनी दिली. त्यामुळे अनधिकृतपणे झोपड्या उभारुन वीजचोरी करणाºयांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.