..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी
By अनंत खं.जाधव | Published: July 8, 2024 05:45 PM2024-07-08T17:45:48+5:302024-07-08T17:46:34+5:30
'निवडणुका आल्या की रोजगार आठवतो'
सावंतवाडी : निवडणूकजवळ आल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर इथल्या तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांचे आमिष दाखवत आहेत. परंतु या आधी त्यांनी केलेल्या चष्मा कारखाना, सेटअप बॉक्स, ऍक्युझमेंट पार्क आदी घोषणांचे काय झाले त्या कुठे गेल्या ? त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाही आमदार करा परंतु केसरकर नको असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर यांना शिक्षण खातेच कळाले नाही म्हणून कदाचित त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची नोंद गिनीज बुकात घेण्यात आली असावी असा टोलाही तेली यांनी लगावला.
तेली म्हणाले, केसरकर यांनी माझी पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी भाजप नेत्यांकडे करणार असल्याचे वक्तव्य केले. मुळात मी कुठलीही पातळी सोडून केसरकर यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. संच मान्यतेच्या नवीन निकषानुसार मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, डीएड बीएड धारक यांच्यावर होणाऱ्या अन्यासंदर्भात आपण बोललो हे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले होते. त्यामुळे याला शिक्षण मंत्री म्हणून केसरकरच जबाबदार असल्याचे तेली म्हणाले. आपण केसरकर यांना शिक्षण खाते कळाले नाही असे म्हणालो. यामध्ये वैयक्तिक पातळी सोडून कुठलीही टीका केलेली नाही.
केसरकर यांनी पुन्हा तक्रार करावीच
त्यामुळे त्यांनी खुशाल माझ्या हकालपट्टीची मागणी करावी. उलट मीच त्यांना शिक्षण खाते समजत नसल्याने मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. केसरकर यांनी ज्या ज्या वेळी माझी तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे त्यावेळी मला पक्षात चांगल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केसरकर यांनी पुन्हा एकदा माझी तक्रार करावीच.
..तर कोणाकडे अपेक्षा करणार?
सिंधुदुर्गातील शिक्षण संस्था टिकल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा आहे, येथील मुलांवर होणारा अन्याय शिक्षकांवर आलेल्या अडचणी याबाबत आपण बोललो यात गैर कुठे? तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री आहात त्यामुळे आम्ही तुमच्याकडे नाही तर कोणाकडे अपेक्षा करणार? त्यामुळे भविष्यातही आपण यावर बोलत राहणार.
बोलायला भाग पाडू नका, नाहीतर..
तेली पुढे म्हणाले, युती धर्म मी सुद्धा पाळतो म्हणूनच गप्प आहे, मला उमेदवारी मिळावी असे मी कधीच म्हणालो नाही. भाजप पक्षाला येथून उमेदवारी दिली जावी अशी आपली मागणी आहे. परंतु तुमच्यासारखं मला खोटं बोलता येत नाही हीच माझी मोठी अडचण आहे. त्यामुळे मला बोलायला भाग पाडू नका, माझं तोंड उघडलं तर तुम्हाला खूपच अडचणीच होईल हे लक्षात ठेवा.
निवडणुका संपल्या की रोजगार विसरतात
निवडणुका जवळ आल्या की ते युवकांना रोजगार देतात निवडणूका संपल्या की रोजगार विसरतात. आज इथल्या तरुणांना जर्मन येथे नोकऱ्या देणार असल्याचा नवीन आमिष त्यांनी आणलं आहे. मात्र याआधी त्यांनी येथील जनतेला चष्मा कारखाना. सेटअप बॉक्स, एक्युझमेंट पार्क आदीची आश्वासने दिली त्याचे काय झाले याचे उत्तर द्यावे अशी मागणी ही तेली यांनी केली.