..मात्र तुम्ही निवडून येऊ शकणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा राजन तेलींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:59 AM2023-05-08T11:59:12+5:302023-05-08T12:00:43+5:30
मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती पराभव करेल
सावंतवाडी : मी मंजूर केलेल्या निधीतील कामाचे कितीही नारळ फोडा पण निदान माझे नाव तरी घ्या दुसर्यानी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडले म्हणून तुम्ही निवडून येऊ शकणार नाही. तुमची पराभवाची हॅटट्रिक ही होणारच अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली याच्यावर केली. तसेच माझ्यात व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यात कोणीतरी भांडणे लावून देण्याचे काम करत आहे असा आरोपही मंत्री केसरकर यांनी केला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नितीन मांजरेकर, सचिन वालावलकर, गुड्डू जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, शिवसेना भाजप युती अभेद्य आहे. असे असताना काहीजण त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्यात व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न सुरू केला आहे. असे असले तरी मंत्री चव्हाण हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यामुळे असे वाद निर्माण करून आम्ही एकमेकापासून लांब जाणार नाही हे लक्षात ठेवावे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत असून त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर जात आहे.
मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना हे पटत नाही. त्यामुळे ते आमच्यात वाद निर्माण करून स्वताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याना इथे निवडणूक लढवायची आहे त्यांनी जरूर निवडणूक लढवावी पण आतापासूनच वाद कशाला निर्माण करता असा सवाल मंत्री केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच मी आणलेल्या निधीतून काहीजण नारळ फोडण्याचे काम करतात पण ही भूमिपूजन करताना निदान माझे नाव तरी घ्या असा उपरोधिक टोलाही मंत्री केसरकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लगावला.
मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती पराभव करेल
सावंतवाडी मतदारसंघात कोणतेही काम करायचे झाले तर आमदार म्हणून माझे पत्र लागते एवढे तरी भूमिपूजन करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच हे नारळ फोडतात त्यांना कदाचित येथून पराभवाची हॅट्ट्रिक साधायची असेल जिल्हा परिषद ला पराभूत झालेले आता सावंतवाडी मतदारसंघात आले आहेत आतापर्यंत दोन वेळा येथील जनतेने पराभूत केले तरी सुद्धा तिसऱ्यांदा नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी निवडणूक रिंगणात नसलो तरी दुसरी व्यक्ती यांचा निश्चितच पराभव करेल असेही मंत्री केसरकर म्हणाले.