Sindhudurg: पारपोलीतील फुलपाखरांचे विश्व उलगडणार, उद्यापासून महोत्सव सुरु
By अनंत खं.जाधव | Published: October 19, 2023 06:10 PM2023-10-19T18:10:05+5:302023-10-19T18:11:55+5:30
गावात सुमारे 180 जातीची फुलपाखरे
सावंतवाडी : फुलपाखरू महोत्सवाच्या निमित्ताने पालपोली गावातील फुलपाखरांचे विश्व उलगडणार असून फुलपाखरे बघण्यासाठी हजारो पर्यटक पारपोली गावात येणार आहेत या गावात सुमारे 180 जातीची फुलपाखरे असून या निमित्ताने या फुलपाखरांच्या प्रजातीची ओळख पर्यटकांना होणार आहे.
उद्या शुक्रवारपासून सोमवार (दि.२३) पर्यंत चार दिवस हा फुलपाखरू महोत्सव चालणार असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण याच्या हस्ते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यातील आंबोलीपासून त्याच्या पायथ्यापर्यंतची गावे ही नैसर्गिक साधनसंपत्तीचे नटली असून या गावातील पर्यटनाचे विश्व ही सर्वासमोर आल्यास अनेक पर्यटक या गावामध्ये येणार आहे. वनविभागाच्या पुढाकारातून प्रथमच पारपोली गावात फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला आहे. पारपोली परिसरात सुमारे फुलपाखरांच्या १८० प्रजाती आहेत. फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली ओळख निर्माण होणार आहे त्यामुळे परिसरात पर्यटन आधारित रोजगार येऊ शकतो गावात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
या निमित्ताने फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले हे म्हणाले, सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हंगामी फुलपाखरू आढळून येतात. थंडीच्या कालावधीत फुलपाखरू विशेषतः आढळत नाहीत. मात्र पारपोलीमध्ये १८० फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. आंबोलीमध्ये देखील फुलपाखरू उद्यान आहे. आंबोलीतील वाहणारे धबधबे आणि नैसर्गिक दृष्ट्या जंगल पारपोलीमध्ये असल्याने फुलपाखरांसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण आहे.
महोत्सवातून रोजगारावर भर
फुलपाखरू महोत्सवातून रोजगारावर भर देण्यात आला असून पारपोली गावातील काही घरे ही पर्यटक राहाण्यासाठी घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 35 पर्यटक तर दुसऱ्या टप्यात 35 असे सत्तर पर्यटक गावात महोत्सवाच्या निमित्ताने वास्तव्य करणार आहेत.