फुलपाखरू महोत्सव वर्षभर भरविण्यात यावा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण
By अनंत खं.जाधव | Published: October 20, 2023 04:26 PM2023-10-20T16:26:37+5:302023-10-20T16:27:01+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात ...
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात महोत्सव न भरवता वर्षभर असे महोत्सव व्हावेत यातून पारपोली गावला एक नवीन दिशा मिळेल हा भाग पर्यटनाचे एक नवीन स्थळ म्हणून विकसित होईल असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडले. तर भविष्यात पारपोली फुलपाखरांचे गाव जगाच्या नकाशावर येईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
पारपोली येथे वनविभाग तसेच सिंधुरत्न व पारपोली वनव्यवस्थापन समिती याच्या सहकार्यातून फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच कृष्णा नाईक आदी. उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपघाताने पालकमंत्री झालो. तरी जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने जे करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. पर्यटनाच्या वाढीसाठी सिंधुरत्न योजनेतून मंत्री दीपक केसरकर यांनी भरवलेला हा महोत्सव खरोखरच येणाऱ्या काळासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न होता वर्षभर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत मांडले.
मंत्री केसरकर म्हणाले, पारपोली या गावात आढळणारी विविध प्रकारचे फुलपाखरू लक्षात घेता हे गाव फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. आंबोलीची ओळख ज्याप्रमाणे आज जगाच्या नकाशावर झाली आहे तीच ओळख भविष्यात पारपोली गावची झाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि याचाच भाग म्हणून रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून फुलपाखरू महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला मात्र एखादा महोत्सव घेऊन गावाचा विकास होत नाही तर त्या ठिकाणी बारमाही पर्यटन चालले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सगळ्या गावाने पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून आपले गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
तसेच काका भिसे व हेमंत ओगले यांच्या पावलावर पाऊल टाकून गावातील तरुणांना फुलपाखरू प्रशिक्षक म्हणून निर्माण करावेत असे आवाहन केले. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी महोत्सव घेण्यामागे फुलपाखरू संवर्धन आणि संरक्षण हा या मागचा उद्देश असून भविष्यात पर्यटकांना याठिकाणी फुलपाखरू निरिक्षण व अभ्यासकांना अभ्यास दौरे उपलब्ध करुन देण्यात येईल. हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न चालविता जास्तीत जास्त कसा चालविता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. असे स्पष्ट केले. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड यांची भाषणे झाली.