नियोजित जागीच ‘सी-वर्ल्ड’ : राणे
By admin | Published: September 11, 2016 11:13 PM2016-09-11T23:13:38+5:302016-09-11T23:17:29+5:30
मुख्यमंत्र्यांचे अभिवचन : पाट-परबवाडा ग्रामपंचायतचे उद्घाटन
कुडाळ : काहीही झाले तरी सी-वर्ल्ड प्रकल्प आहे त्याच जागी राहणार असून, विमानतळ प्रकल्पही वेळेतच पूर्ण करणार, असे अभिवचन विधिमंडळात मुख्यमंत्र्यांकडून घेतले असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाट-परबवाडा ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलताना केले.
तालुक्यातील पाट-परबवाडा ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आमदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, पंचायत समिती सदस्य माधवी प्रभू, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पाट सरपंच कीर्ती ठाकूर, संजय वेंगुर्लेकर, मोहन सावंत, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, लोकसभा मतदार संघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, उपाध्यक्ष रूपेश पावसकर व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार नारायण राणे म्हणाले, सरपंच ठाकूर यांनी खरोखरच काम केले आहे. नुसती इमारत चांगली होऊन उपयोग नाही, तर या इमारतीत विकासाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे सरकार आल्यापासून या दोन वर्षांत कोकणाचा विकास मात्र ठप्प आहे. मी पालकमंत्री असताना अनेक विकासात्मक प्रकल्प आणले. विमानतळामुळे जगातील पर्यटक इथे येतील. त्यावेळी तुम्हाला विमानतळाचे महत्त्व समजेल. पर्यटन जिल्हा केला, कारण इथेच रोजगार उपलब्धी व्हावी, येथील तरुणांनी इथेच नोकरी करावी व आर्थिक सुबत्ता आणावी हा यामागचा उद्देश असल्याचे राणे यांनी सांगितले.
यापुढे राणे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितले होते की, तलवारच्या म्यानीत एकच तलवार राहू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला कीर्ती व पैसा यापैकी एकच गोष्ट मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही कीर्ती मिळवा, असे सांगितले. भ्रष्टाचाराचा डाग पुसण्याचा एकही साबण नाही, हे लक्षात ठेवून काम करा. मी अनेक खाती सांभाळली. मात्र, माझ्यावर कोणताच भ्रष्टाचाराच आरोप नाही, असेही सांगितले. लाचारपणे वागू नका. कर्तृत्व असेल तर लाचारी करण्याची गरज लागत नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.
जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई म्हणाले, सर्वांची एकच इच्छा होती की, नारायण राणे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन व्हावे व ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. राणे यांच्यामुळेच या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळेच आज ही इमारत पूर्ण होऊ शकली. या वास्तूमध्ये ग्रामपंचायतीबरोबरच तलाठी कार्यालय, खरेदी विक्री संघ कार्यालय असे अनेक सेवा देणारे विभाग या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे जनतेची कामे लवकरात लवकर होणार आहेत.
गेली अनेक वर्षे सुसज्ज अशी ग्रामपंचायतीची इमारत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. या दरम्यान या जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रणजित देसाई हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूच्या कामाने वेग घेतला. त्यांच्या तसेच विकास कुडाळकर, संजय वेंगुर्लेकर यांच्या व सर्व अधिकारी वर्गांच्या सहकार्यामुळे आज ही नूतन वास्तू उभी राहू शकली, असे सरपंच कीर्ती ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी ही वास्तू उभी राहण्यासाठी सहकार्य केलेल्या रणजित देसाई, संजय वेंगुर्लेकर, विकास कुडाळकर, कीर्ती ठाकूर, ग्रामविकास अधिकारी खोबरेकर यांचा तसेच ग्रामपंचायतीच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
दत्ता सामंत म्हणाले, आता येथील जनता आम्ही चूक केली, आम्ही आता दहा वर्षे मागे गेलो आहोत, असे म्हणत आहे. त्यामुळे यापुढे निवडून दिलेल्या अकार्यक्षमांना परत पाठवा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्कालीन ग्रामविकास अधिकारी उमेश खोबरेकर यांनी केले. (प्रतिनिधी)