सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द होऊ शकतो
By Admin | Published: July 17, 2017 12:02 AM2017-07-17T00:02:35+5:302017-07-17T00:02:35+5:30
सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द होऊ शकतो
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणाऱ्या तसेच येथील प्रगतीत भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या आमदारांनी मालवण येथील आमसभेत आपले अज्ञान प्रकट केले आहे. पालकमंत्री तसेच या आमदारांची हा प्रकल्प उभारण्याची क्षमता नसल्याने तो रद्द होण्याच्या स्थितीत असून, त्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होणार आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केला.
येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मालवण येथील आमसभेत आमदार वैभव नाईक यांनी वायंगणी- तोंडवळी येथील सी-वर्ल्डबाबत आपले अज्ञान प्रकट केले आहे. सी-वर्ल्ड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा हा प्रकल्प आहे. मी पालकमंत्री असताना हा प्रकल्प जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून या प्रकल्पाला मागणी होती. तरीही अनेक मंत्र्यांच्या विरोधाला तोंड देऊन तो पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात यावा यासाठी मंजूर करून घेतला आहे.
हा प्रकल्प राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्र शासनाचा पर्यटन विभाग तसेच खासगी गुंतवणूकदारांच्या सहकार्याने उभारण्यात यावा असे सांगून त्यावेळी परवानगी दिली होती. तसेच या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये जिल्ह्याच्या तिजोरीत जमा केले होते. १२०० कोटींचा असलेला हा प्रकल्प आता २००० कोटीपर्यंत गेला असेल. मात्र कधीही हा प्रकल्प ५००० कोटींचा नव्हता.
राज्य शासनाने या प्रकल्पासाठी पहिला निधी खर्च करावा, तसेच केंद्र शासनाने त्याला मदत करावी व निधी कमी पडल्यास खासगी गुंतवणूकदारांची मदत घ्यावी, असे ठरले होते. त्यामुळे प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शासनाने अजूनही प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली नाही. तसेच प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येणार? त्याचा प्रारूप आराखडा कसा असणार हे प्रसिद्ध केलेले नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी अटी, शर्ती याबाबत माहिती दिलेली नाही. त्याची जाहिरातही प्रसिद्ध केलेली नाही. तर गुंतवणूकदार प्रकल्पात कसे गुंतवणूक करणार? एवढेही या आमदारांना समजत नाही. प्रकल्पाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमदारांनी निदान याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तरी आमसभेत बोलणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. सध्याची या प्रकल्पाची स्थिती पाहिली तर तो रद्द झाला, असे समजायला हरकत नाही.
एवढ्या मोठ्या प्रकल्पाची माहिती देताना आमदारांनी शासनाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊनच ती जनतेला देणे अपेक्षित आहे. आमदार होऊन तीन वर्षे होत आली तरी या आमदारांना याचे ज्ञान नाही, हे दुर्दैव आहे.
यापूर्वी पालकमंत्र्यांनीही विमानतळाबाबत चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली होती. विमानतळासाठी आपण निधी आणला अशी प्रसिद्धी त्यांनी केली होती. मात्र, चिपी येथील विमानतळ खासगीकरणातून उभारला जात आहे. खासगी कंपनीने त्यासाठी आतापर्यंत खर्च केला आहे. नवीन पालकमंत्र्यांच्या राजवटीत त्याचे क्षेत्र पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. हे सत्य आहे.
या विमानतळावर जुलैमध्ये उड्डाणाची चाचणी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु आता ती चाचणी नोव्हेंबरमध्ये केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचेही भवितव्य अंधारात आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.
आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही
राष्ट्रीय महामार्ग ६६ वर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत असून लोकांचे बळीही जात आहेत. खड्डे बुजवून घेण्यास पालकमंत्री तसेच आमदार नाईक कमी पडले आहेत. त्यामुळे त्या दोघांना आमदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. अपघातात माणसे जखमी होण्याला हे दोघे शिवसेनेचे आमदार जबाबदार असून, ते कार्यशून्य आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.