सी-वर्ल्डला ग्रामस्थांचा विरोध कायम

By admin | Published: July 4, 2016 11:35 PM2016-07-04T23:35:52+5:302016-07-05T00:08:37+5:30

वायंगणीतील ग्रामसभेत वादळी चर्चा : शुभारंभाचा नारळ फोडणारे ‘लक्ष्य’

C-World remains opposing villagers | सी-वर्ल्डला ग्रामस्थांचा विरोध कायम

सी-वर्ल्डला ग्रामस्थांचा विरोध कायम

Next

आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वायंगणी ग्रामपंचायतीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत वादळी चर्चा रंगली. आता प्रकल्पाला विरोध दर्शविणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी यापूर्वी सी-वर्ल्ड मोजणीच्या शुभारंभाचा नारळ फोडलाच कसा? असा सवाल करत विरोध दर्शविणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच निशाणा साधला. तर काही ग्रामस्थांनी प्रकल्पाची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले. प्रकल्पाला आपला विरोध होता आणि यापुढेही राहील, असे सांगत उपस्थित शंभर ते दीडशे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सी-वर्ल्ड विरोधाचा ठराव घेतला.
सी-वर्ल्ड प्रकल्पाचा आराखडा ४०० एकरचा केल्यानंतर संस्थेने नव्या आराखड्यानुसार गावातील हद्द निश्चितीसाठी चिन्हांकन प्रक्रिया हाती घेतली होती.
या प्रक्रियेस विरोध दर्शविताना वायंगणी गावाच्यावतीने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच प्रज्ञा धुळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे, उपसरपंच हनुमंत प्रभू, सदस्य मालती जोशी, राजन आचरेकर, अमित खोत, प्रफुल्ल माळकर यांच्यासह वायंगणी ग्रामस्थ उपस्थित होते.
१३९० एकर क्षेत्रात सी-वर्ल्ड निश्चित झाला, त्यापूर्वी या प्रकल्पाच्या मोजणी कामाचा शुभारंभ स्थानिक पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंचांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करून शुभारंभाचा नारळ फुटला नसता तर आता विरोध-विरोध करून ग्रामसभा घेण्याची वेळ वायंगणी ग्रामस्थांवर आली नसती असे काही ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ अमित खोत यांनी प्रकल्पाला विरोध असेल तर त्याची कारणे दिली जावीत. कोणाच्या सर्व्हे नंबरमध्ये प्रकल्प निश्चित झाला आहे. याची माहिती नसताना विरोध का? प्रकल्पात कोणाची घरे, जमिनी जाऊ नयेत, अशी आपली भूमिका आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करून होणारा प्रकल्प नकोच.
मात्र विरोध करायचा असेल तर तो दिशाभूल करणारा असू नये, असे स्पष्ट केले. मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी आपला या प्रकल्पाला विरोध आहे असे सांगत खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी वादावर नियंत्रण मिळवताना खोत यांना व्यासपीठाजवळ आणले.
सकाळी १० वाजता सुरू होणारी सभा १०० सभासद ग्रामस्थांचा कोरम ११ वाजेपर्यंत न भरल्याने सुरू
झाली नव्हती. अखेर ११ वाजल्यानंतर ही विशेष ग्रामसभा सुरू
झाली. (वार्ताहर)


उदय दुखंडे : धनदांडग्यांच्या जागा वळविल्या
पूर्वी हा प्रकल्प होत असताना जो १३९० एकरचा आराखडा होता. त्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी ४०० एकरवर आणला. याचा आराखडाही तयार झाला. मात्र, या आराखड्यात धनदांडग्यांनी खरेदी केलेली जमीन वगळण्यात आली आहे, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला. तर केवळ स्थानिक शेतकरी व कसणाऱ्यांच्या जमिनी घेण्याचा डाव शासनाचा आहे. याबाबत मुंबईतील आमची समिती माहितीच्या अधिकारात माहिती मिळवत असल्याचेही उदय दुखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


दीडशे ग्रामस्थांची उपस्थिती
सभा संपेपर्यंत गावातील १६०० हून अधिक मतदारांपैकी दीडशे ग्रामस्थही उपस्थित नव्हते. अखेर वायंगणी गावाचा या प्रकल्पाला विरोध आहे, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवकांनी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत मांडले. हा ठराव शासन स्तरावर पाठविण्यात यावा, असे ठरविण्यात आले.

Web Title: C-World remains opposing villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.