मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही : केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:33 AM2019-12-14T11:33:47+5:302019-12-14T11:34:58+5:30
सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सावंतवाडी : सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
साळगावकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक लागली. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी न भरता थांबावे. भविष्यात त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले जाईल, असाही विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, वसंत केसरकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, मी कोणाविषयी शत्रुत्व ठेवून कधीही विरोध केला नाही. ही माझी खासियत आहे. राणेंना राजकीयदृष्ट्या संपवून दहशतवाद संपणार नाही. मात्र त्यांची चुकीची प्रवृत्ती होती. त्याला रोखण्याचे काम मी केले. त्यामुळे तुरुंगात कोणाला वडापाव खावा लागला याचा अभ्यास त्यांनी करावा. छोट्या राणेंनी केलेल्या टीकेवर मी काही बोलणार नाही.
केसरकर पुढे म्हणाले, आमचा उमेदवार हा नगरसेवक म्हणून काम केलेला आहे. सामाजिक कामाची जाणीव आहे. त्यांच्यात बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्याची ताकद आहे. त्यामुळे ते निश्चितच विजयी होतील, असा विश्वास आहे.
सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगात सहभागी होणाऱ्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासासाठी भरीव कामगिरी बजावली जावी म्हणून प्रयत्न आहेत असे केसरकर म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी यांच्याशी बोलून विचार करू असे ते म्हणाले. शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार खेमराज तथा बाबू कुडतरकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरातील जनताजनार्दन यांच्यामुळे विकासासाठी निधी आणला आहे. आता शहराच्या विकासासाठी शिवसेना उमेदवार विजयी करण्यासाठी लोक पुढाकार घेतील, असे केसरकर यांनी सांगितले.