मुंबई-गोवा महामार्गावर हेल्मेट सक्तीपर्यंत मोहीम सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:53 PM2017-11-18T15:53:33+5:302017-11-18T16:05:36+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य टक्क्यांवर जोपर्यंत हेल्मेट सक्ती होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवणार असून हेल्मेट सक्ती झाल्यावर याच वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाईल अशी माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी दिली.
तळेरे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य टक्क्यांवर जोपर्यंत हेल्मेट सक्ती होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवणार असून हेल्मेट सक्ती झाल्यावर याच वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाईल अशी माहिती सिंधुदुर्ग महामार्ग पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी क्षेत्रातील सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय महामार्ग पोलीस अधीक्षक अंबुरे यांनी घेतला आहे. त्यानुसार विभागाची बैठक घेऊन अंमलबजावणीची सुरू आहे.
मात्र, जनतेतून सर्वत्र हेल्मेट सक्तीबाबत नाराजी व्यक्त होत असली तरी हेल्मेट सक्तीमुळे आज अनेकांना सुरक्षितता वाटत आहे. तसेच चारचाकी वाहनांचे चालकही विना सीटबेल्ट जात असल्याने त्यांनाही थांबवून सध्या कारवाई केली जात आहे.
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू आहे. दंड वसुली करणे हा आमचा उद्देश नाही. तर वाहनचालकांनी हेल्मेट घालून वाहने चालवावी यामुळे ही चांगली सवय लागेल. तसेच सध्या हेल्मेट न घातल्यामुळे होणारे गंभीर अपघात टळले जातील अशी अपेक्षा आहे.
लोकजागृतीनंतर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी : संजय डौर
यासंदर्भात महामार्ग पोलीस निरीक्षक डौर यांना विचारले असता ते म्हणाले, हेल्मेटमुळे अपघात होण्याचे व त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करताना हेल्मेट आवश्यक आहे. लोकांच्यात जागृती करण्याचे काम सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात केवळ राष्ट्रीय महामार्गावर नंतर राज्य महामार्गावर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्यात जागृती झाल्यानंतर सर्वत्र हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल. वाहन चालकांचे हेल्मेट घालण्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आम्हीच या वाहन चालकांचे पुष्प देऊन स्वागत करु असे ते म्हणाले.
यासाठी महामार्ग पोलीस अधीक्षक अबुंरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजय डौर, पोलीस उपनिरीक्षक पालव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पार्सेकर यांच्यासह सर्व टिम सध्या हेल्मेट व वाहन नियम पाळण्यासाठी मेहनत घेत आहे.