कालव्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण, तिलारीचे पाणी 5 एप्रिलपर्यंत ओटवणेत; गोव्याकडूनही परवानगी
By अनंत खं.जाधव | Published: March 30, 2023 03:33 PM2023-03-30T15:33:26+5:302023-03-30T15:34:46+5:30
सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले
सावंतवाडी : तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात झाली आहेत. त्यामुळे आता 5 एप्रिल पर्यंत पाणी ओटवणे रोणापाल, निगुडे गावापर्यंत पोहोचणार आहे. याचा फायदा सर्व गावांना होणार आहे. याबाबतची माहिती तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
तिलारीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये गुरूवार पासून २.० घमी प्रतिसेकंद वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचं विलवडे, सरमळे, इन्सुली, ओटवणे, नेतर्डे, डोंगरपाल, बांदा, वाफोली या सर्व गावांना याचा फायदा होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने व कालव्यात अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने इन्सुली सह ओटवणे निगुडे रोणापाल येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी कालव्यात बसून जलआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर कालव्यातील कामे युद्धापातळीवर पूर्ण करण्यात आली.
नुकत्याच सावंतवाडीत झालेल्या आढावा बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते. तसेच लोकांची मागणी लक्षात घेता विजघर येथील विद्युत प्रकल्पाचे पाणी तत्काळ थांबवा आणि शेतकऱ्यांना तात्काळ पाणी सोडा, अशा सूचना केल्या होत्या. अभियंता कोरे यांनी याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले आहे.
कालव्यातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून २६ मार्च पासून पाण्याचा विसर्ग १.० घमी प्रतिसेकंद वरून २.० घमी प्रतिसेकंद करण्यात आला आहे. आजपासून विसर्गामध्ये अजून वाढ़ करण्यात येणार आहे. यासंदर्भात गोव्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. पाण्याचा विसर्गाचा वेग वाढविण्यात आल्यानंतर ५ एप्रिल पर्यंत ४२ किलोमीटर लांबीच्या कालव्यात पाणी पोहोचणार आहे.