कालव्याची स्थिती ‘ना घर का’

By admin | Published: May 21, 2015 11:12 PM2015-05-21T23:12:18+5:302015-05-22T00:13:24+5:30

स्थानिक शेतकरी भरडले : तिलारी कालव्याची कामे संथगतीने

Canal status 'No home' | कालव्याची स्थिती ‘ना घर का’

कालव्याची स्थिती ‘ना घर का’

Next

महेश चव्हाण - ओटवणे -तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून, यात स्थानिक शेतकरी भरडले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात शेतीत तसेच घरांमध्ये कालव्याचे पाणी गेले होते.
२५ वर्षांपासून गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्तिक प्रकल्प असलेल्या तिलारी कालवा प्रकल्पाने शेतकऱ्यांना पाणी देणे तर सोडाच विविध समस्या माथी लादल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बाढा शाखा कालवा माध्यमातून ओटवणेत आलेल्या या कालव्याच्या कामकाजामुळे ओटवणे (मांडवफातरवाडी) ग्रामस्थांना नुकसानाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी कालव्याच्या मुख्य हौदाच्या खोदाईसाठी वारंवार केलेल्या सुरुंग स्फोटामुळे भरवस्तीतील घरांना तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसानाकडे कानाडोळा करीत प्रकल्प अधिकारी व ठेकेदाराने सुरुंग स्फोट सुरुच ठेवले होते. वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार देऊनसुद्धा अधिकारीवर्गाने कोणतीच कारवाई न केल्याने अखेरीस ग्रामस्थांनी काम बंद पाडले. जोपर्यंत घरांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
गेले वर्षभर नुकसान भरपाईच्या नावाखाली पंचनामे केले गेले, कागदपत्र रंगवली गेली. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात अजून दमडीही पडलेली नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या सुरुंग स्फोटामुळे भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरात राहणे असुरक्षित बनले आहे.
भेगांमधून पाणी पाझरुन घरात ओल निर्माण होत असल्याने राहायचे कोठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांसमोर आहे.


पुरेशी नुकसान भरपाई नाही
नुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये काही स्थानिक ग्रामस्थांना ६०० रुपये ते ११०० रुपये अशी अत्यल्प नुकसान भरपाई नमूद आहे. त्यामुळे शासन जनतेची चेष्टा करीत असल्याचा राग ग्रामस्थांनी व्यक्त केला.
पाण्याचा निचरा नाही
भरवस्तीतून गेलेल्या या कालव्यातून येणारे पाणी पलिकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसात लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. तसेच विहिरींचे पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे पाण्याचाही योग्य निचरा होणे गरजेचे आहे. गेले वर्षभर स्थानिक ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून, हरितक्रांतीच्या दृष्टीने उभारण्यात येणारा हा प्रकल्प ग्रामस्थांच्या जीवावर बेतत असेल, तर हा प्रकल्प बंद करा, असा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Web Title: Canal status 'No home'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.