कालव्याचे काम सुरू मात्र, ५२ कुटुंबे वाऱ्यावर

By admin | Published: February 4, 2015 09:43 PM2015-02-04T21:43:07+5:302015-02-04T23:54:38+5:30

ओटवणेतील स्थिती : तीन वर्षानंतरही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Canal work begins, but 52 families wind up | कालव्याचे काम सुरू मात्र, ५२ कुटुंबे वाऱ्यावर

कालव्याचे काम सुरू मात्र, ५२ कुटुंबे वाऱ्यावर

Next

सावंतवाडी : ओटवणे मांडवफातरवाडी येथे तीन वर्षांपूर्वी ओटवणे कालव्याचे काम सुरू असताना केलेल्या सुरूंग स्फोटामुळे ५२ घरांना तडे गेले होते. या घराचे पंचनामे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत कुटंबांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मात्र, कालव्याचे काम सुरू असून ही कुटुंबे प्रशासनाने वाऱ्यावर सोडली आहेत. बांधकाम विभागाने पंचनामे केल्यानंतरही मदत केव्हा मिळणार या प्रतीक्षेत येथील कुटुंबे आहेत.ओटवणे येथील इन्सुली ते ओटवणे या कालव्याचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. या कालव्यासाठी संबंधित ठेकेदार सुरुंग स्फोट करत होता. या स्फोटामुळे परिसरातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मांडवफातरवाडीतील तब्बल ५२ घरांचा समावेश आहे. या घरांना मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या आहेत. या भेगा एवढ्या आहेत की, ही घरे कधीही कोसळू शकतात अशी अवस्था आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषणे तसेच आंदोलने केली. मात्र, या नुकसानग्रस्त कुटूंबांना अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नाही.या ५२ कुटुंबांनी एक वर्षापूर्वी उपोषण केले तेव्हा प्रशासनाने महसूल व बांधकाम विभाग या घराचे पंचनामे करतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे बांधकाम विभागाने या परिसरात जाऊन पंचनामे केले. या पंचनाम्याचा अहवालही पाटबंधारे विभागाला दिला. पण तिलारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत यावर निर्णय घेतेलेला नाही. ओटवणे येथील ग्रामस्थ अविनाश पनासे यांनी वेळोवेळी याबाबत प्रशासकीय पातळीवर ही मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पण त्यावर कारवाई झाली नाही. पनासे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माहिती देण्यात आली नाही. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर त्यांनी तिलारीच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ही ५२ कुटुंबे मोठ्या अडचणीत असून काही घरांना तर मोठ्या प्रमाणात भेगा गेल्याने आतमध्ये राहणारी कुटूंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. (प्रतिनिधी)

बांधकाम विभागाने पंचनामा करून नुकसानीचा अहवाल दिला आहे. हा अहवाल आम्हाला नियामक मंडळाकडे ठेवावा लागेल. त्यानंतर या नुकसान भरपाईचे वाटप करावे लागणार आहे. आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती दिली.
- धीरज साळे,
कार्यकारी अभियंता, तिलारी विभाग

Web Title: Canal work begins, but 52 families wind up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.