गणेशोत्सवातील परीक्षा रद्द करा
By admin | Published: September 17, 2015 11:28 PM2015-09-17T23:28:21+5:302015-09-17T23:44:31+5:30
राजू मसूरकर : आंदोलन करण्याचा इशारा
सावंतवाडी : गणेशोत्सव म्हणजे हिंदू धर्मियांचा जिव्हाळ्याचा सण. महिलांसह थोरांना तो अध्यात्मीक संस्कृतीत रममाण करतो. तर लहानांच्यात नवचैतन्य निर्माण करतो. दरम्यान या मुलांच्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंधेपासून ते चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशीही परिक्षा असल्याने याबाबत जीवनरक्षा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.हिंदू धर्मातील गणेश चतुर्थी सणाला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. घराघरात गणपती असल्याने सर्व लहान मुलांना आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आनंद लुटता येतो. तसेच एकमेकातील कटूता दूर व्हावी, देशप्रेम जागृत व्हावे हा उदात्त हेतू लाकमान्य टिळकांनी ठेवला होता. मात्र, टिळकांच्या हा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थामधून पायदळी तुडविला जात असून, प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी, तसेच चतुर्थीच्या तिसऱ्यादिवशी अनेक शिक्षणसंस्थामध्ये पाचवी ते आठवी, अकरावी ते बारावी तसेच कॉलेजच्या परीक्षाही सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना गणेश चतुर्थी सणाचा आनंद लुटता येत नाही. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात निषेध व्यक्त केला जातो त्याप्रमाणे शिक्षणसंस्था व कुलगुरूंकडे निषेध व्यक्त करुन हिंदू धर्मातील सणांची आठवण करुन देण्याची गरज असल्याचे मत जीवनरक्षा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
चतुर्थीच्या दिवसात असणाऱ्या या परीक्षा रद्द करुन आठ दिवस सुट्ट्या शिक्षणसंस्थेने जाहीर कराव्यात, अन्यथा हिंदू धर्मियांच्या विविध संघटनांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा राजू मसूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)