ठेकेदारांचे परवाने रद्द करा : नीलेश राणे
By admin | Published: October 7, 2016 10:23 PM2016-10-07T22:23:08+5:302016-10-07T23:55:09+5:30
चौपदरी रस्ता नेमका कुठे, कसा होणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. समन्वयाचा अभाव आहे.
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या स्थितीला महामार्ग डांबरीकरण करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे आर. डी. सामंत यांच्यासह संबंधित सर्वच ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत. खड्डेमय महामार्गावर आता एक जरी जीव गेला तर त्याला हे ठेकेदारच जबाबदार राहतील, असा हल्लाबोल कॉँगे्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
महामार्गावरील खड्डे चिरे, पेवर ब्लॉकने बुजविण्यात आले. आज त्याचीही दयनीय स्थिती आहे. मुंबई महानगरपालिकेने पेवर ब्लॉक काढा, असे आदेश दिले आहेत. मात्र, आपल्याकडे महामार्गावर पेवर ब्लॉक बसविले जात आहेत. डांबरीकरणाच्या मुदतीआधी खड्डे पडतातच कसे, देखभाल दुरुस्ती का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. सामंत यांचा मुलगा आमदार आहे. निदान त्यांच्या मतदारसंघातील महामार्ग तरी नीट करावा. बांधकाम विभागात सी. सी. टी. व्ही. लावा. निविदा प्रक्रिया बंद खोलीत करू नका. दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असेही ते म्हणाले.
चौपदरीकरणासाठी अजून जमीन संपादन पूर्ण झालेले नाही. चौपदरी रस्ता नेमका कुठे, कसा होणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. समन्वयाचा अभाव आहे. वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण डिसेंबर २०१६मध्ये होईल, असे जाहीर केले होते. हे काम पूर्ण होण्यास किती वर्षे लागणार हे गडकरीनाच माहीत आहे, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी
...ते केवळ मंत्रीपदासाठी भुकेलेले
जैतापूर प्रकल्पाचा विषय निवडणुकीपुरता उरला आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी ९० टक्के लोकांनी नुकसानभरपाई स्वीकारली आहे. खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी रत्नागिरीत नव्हे; जंतरमंतरवर उपोषण करावे, लोकसभेत भांडावे. आमदार राजन साळवी यांना एका शिक्षकाची बदली करता येत नाही ते जैतापूर प्रकल्प कसा रद्द करणार? पालकमंत्री रवींद्र वायकर यांना कोयनेचे पाणी मुंबईत नेण्याची घाई झाली आहे. या तिघांच्या तीन तऱ्हा आहेत. येथील लोकप्रतिनिधी केवळ मंत्रीपदासाठी भुकेलेले आहेत, असा आरोप राणेंनी केला.