आरक्षित प्रभागांत उमेदवारांचा दुष्काळ
By admin | Published: October 4, 2015 10:09 PM2015-10-04T22:09:50+5:302015-10-04T23:40:20+5:30
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : खुल्या प्रभागांवरुन युती आघाडीत रस्सीखेच
प्रकाश काळे - वैभववाडी -वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या खुल्या प्रभागात सर्वच पक्षांच्या इच्छुकांची भाऊगर्दी असून आरक्षित प्रभागांमध्ये उमेदवार शोधताना सर्वांच्याच नाकीनऊ आले आहेत. आघाडी आणि युतीमध्ये खुल्या प्रभागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. अद्याप कोणत्याही पक्षाचे १७ उमेदवार निश्चित होवू शकलेले नाहीत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी शेवटचे चारच दिवस उरल्याने इच्छुकांमध्ये कोणी कोणाकडून लढायचे? याबाबत संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे.
वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ प्रभाग विविध प्रवर्गांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे उर्वरित प्रभाग क्रमांक एक, पाच, अकरा आणि पंधरा या चार प्रभागांमध्ये बड्या इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी खुल्या प्रभागातील उमेदवारीवरुन बंडखोरी टाळण्यासाठी अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे.
आघाडी आणि युतीमध्ये खुल्या प्रभागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच आघाडी व युतीचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.
आघाडी आणि युतीला बाजूला ठेवण्यासाठी वाभवे गावठाण भागात पक्ष विरहित विकास आघाडीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गावठाण भागात कोणीही कोणत्याच राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही, असा मतप्रवाह तयार झाला आहे. सर्व पक्ष स्वबळावर लढणार असतील तर कदाचित पक्ष विरहितचा ट्रेंड बाजूला पडून त्यातीलच काहीजण विविध पक्षांचे झेंडे घेऊन फिरताना दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष विरहितचा ट्रेंड कितपत यशस्वी ठरतो हे पाहण्यासाठी पुढील चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उमेदवारांची पळवापळव ; सक्षम उमेदवारांची प्रतीक्षा कायम
अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ३ आरक्षित आहे. मात्र या प्रभागात काही पक्षांना उमेदवारच मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कदाचित या प्रभागात झालीच तर दुरंगी लढत नाहीतर बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष उमेदवारांसाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी कमीअधिक प्रमाणात लोकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अजूनही काही प्रभागात सक्षम उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे.
मागील चार दिवसात राजकीय पक्षांनी उमेदवारांची जुळवाजुळव केली होती. मात्र, आदल्या दिवशी एका पक्षाने निश्चित केलेला उमेदवार दुस-या दिवशी दुसऱ्याच पक्षाच्या तंबूत दिसून येत आहे. त्यामुळे एकेका प्रभागात उमेदवारांसाठी दोन तीन वेळा शोधमोहीम राबवावी लागत आहे. उमेदवारांची पळवापळवी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
सतरा उमेदवारांचे आव्हान
आघाडी आणि युतीबाबत अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. आघाडी व युतीचा निर्णय वेळीच झाला नाही; तर चारही प्रमुख पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे या पक्षांपुढे सर्व सतरा प्रभागांमध्ये उमेदवार मिळविण्याचे कठीण आव्हान आहे. हे आव्हान कोण कसे पेलवणार यावरही नगरपंचायत निवडणुकीचे बरेचसे यश अवलंबून राहणार आहे.