मकर संक्रांत सणावर महागाईचे सावट, सुगड, तीळगूळ महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:32 PM2020-01-14T16:32:48+5:302020-01-14T16:33:55+5:30
मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर आल्याने वेगवेगळ्या आकारांची मातीची सुगडे ग्रामीण भागासह कणकवली बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरले आहे.
कणकवली : मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर आल्याने वेगवेगळ्या आकारांची मातीची सुगडे ग्रामीण भागासह कणकवली बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरले आहे.
सर्व महिला आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे आणि मनातील दुरावा दूर करण्यासाठी संक्रांतीला एकमेकांना हळदी कुंकवाचे वाण देतात. मात्र महिलांच्या या वाणांवरही महागाईचे सावट पसरले आहे.
संक्रांतीसाठी सुगड आवश्यक असतात. मात्र, ही सुगड पुजण्याची प्रथा परंपरेनुसार आजही कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच श्रद्धेने सुरू आहे. परंतु नेहमीच्या महागाईमध्ये सुगडेही महाग झाली आहेत. लहान आकाराची सुगड ३० ते ४० रुपयांना एक तर मोठ्या आकाराची सुगड ५० ते ६० रुपयांना एक नग या भावाने कणकवली बाजारपेठांमध्ये विकायला आली आहेत.
दिवसेंदिवस महाग होत चाललेली माती, सुगड बनविण्याची मजुरी, साहित्य, वेळ आदींचा परिणाम यावर्षी सुगडांच्या किमतीवर झालेला दिसत आहे. संक्रांतीचे सगळ्यात मोठे आकर्षण असले तरी महिलांचे मात्र सुगडाचे वाण देण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. तीळगूळ, बोर, गाजर, शेंगदाणे, हुरडा, एखादे फळ, आणि ऊस सुगडात ठेवून ते महिला एकमेकींना देतात. त्यामुळे बाजारात सध्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.