भगव्यासाठी लाविले पणाला प्राण !
By admin | Published: March 25, 2016 11:22 PM2016-03-25T23:22:32+5:302016-03-25T23:39:37+5:30
किल्ले सिंधुदुर्गवर फडकणार भगवा ध्वज : आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती
मालवण : नव्वदच्या दशकात मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरच्या झेंड्यावरून ‘झेंडा आंदोलना’चे मोठे रान पेटले होते. शिवप्रेमींनी किल्ल्याच्या तटावर लावलेला भगवा ध्वज लावल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ध्वज उतरविण्यात नव्हे तर कापण्यात आला होता. त्यानंतर शिवप्रेमींच्या भावनांचा उद्र्रेक होत उग्र आंदोलन झाले. अनेकांवर बेसुमार लाठीचार्ज झाला. शेकडो शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले. प्रकरणाची तत्कालीन युती शासनाने गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, पालकमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर भगवा झेंडा उभारण्यात आला नि संतप्त झालेले शिवसैनिक शांत झाले. आजही ‘झेंडा’ आंदोलनाच्या आठवणीने अनेकांच्या नयनात अश्रू आपसूकच ओघळतात.
शिवप्रेमींचा २०-२५ वर्षापूर्वीचा तो झालेला भावनेंचा उद्र्रेक पाहता किल्ले सिंधुदुर्गवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज आमदार वैभव नाईक यांच्या स्वनिधीतून बसविण्यात येणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी किल्ले सिंधुदुर्गवर भगवा ध्वज पुन्हा एकदा नव्याने फडकणार आहे. ४० फुट उंचीचा फिरता ध्वज असून तीन दिवसापूर्वी किल्ले सिंधुदुर्गावर ध्वज आणि इतर साहित्य नेण्यात आले आहे. २६ रोजी शिवजयंतीनिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भगव्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. किल्ले सिंधुदुर्गचे २२ एप्रिल रोजी ३५० व्या वर्षात पदार्पण करत असून वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या भगव्या ध्वजाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. गेली काही वर्षे अखेरची घटका मोजत असलेल्या या आंदोलनानंतरच्या ‘भगव्या’ला आमदारांकडून पुन्हा एकदा उर्जितावस्था लाभली आहे. भगवा ध्वज व अन्य साहित्य दांडी किनाऱ्यावर आणल्यानंतर तेथे उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये भगव्याच्या आठवणी ताज्या झाल्या. भगवा ध्वज हा शिवप्रेमींची अस्मिता आहे. शिवप्रेमींनीच एका रात्रीत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटावर भगवा ध्वज लावला होता. छोटू सावजी यांनीही आठवणींना उजाळा दिला. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख किरण वाळके, पराग खोत आदी शिवसैनिक
उपस्थित होते. (प्रतिनिधी)