बांदा येथे दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला
By admin | Published: July 8, 2014 10:48 PM2014-07-08T22:48:44+5:302014-07-08T23:19:44+5:30
गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने कारवाई करत ७२ हजार रुपये किमतीच्या दारुसह ५२ लाख ९६ हजार ८६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक सत्यजीत अर्जुन जाधव (वय ३४, रा. पाचंबे-बौध्दवाडी, ता. चिपळुण, रत्नागिरी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात सिपला कंपनीच्या टॅबलेटच्या बॉक्सखाली गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स लपविण्यात आले होते. उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, आर. डी. ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सटमटवाडी येथे सापळा रचला होता. गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टेम्पोच्या (एमएच ०४ एफडी ३५४६) हौद्यात ठेवण्यात आलेल्या सिपला कंपनीच्या डॉवीर एन टॅबलेट बॉक्सच्या खाली तपासणी केली असता हायवर्ड फाईन व्हिस्कीच्या ७५0 मिलीच्या मापाच्या ब्रॅण्डचे पंधरा बॉक्स आढळले. ७२ हजार रुपये किमतीची दारु जप्त करण्यात आली. चालकावर अटकेची कारवाई करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. (प्रतिनिधी)