कारची दुचाकीला धडक; एक ठार
By admin | Published: June 15, 2014 12:28 AM2014-06-15T00:28:28+5:302014-06-15T00:30:51+5:30
बायपासवर मळगाव येथे अपघात
सावंतवाडी : स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत विनायक दत्ताराम जोशी (वय ६७, रा. मळगाव-मांजरेकरवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विजय गोपाळ नार्वेकर (६२, मळगाव-रस्तावाडा) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-आजगावकरवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी नार्वेकर यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
झाराप-पत्रादेवी महामार्गावरील आजगावकरवाडी येथून विनायक दत्ताराम जोशी व विजय गोपाळ नार्वेकर हे दोघे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मांजरेकर-वाडीतील जोशी यांच्या घरी अॅक्टिव्हा या दुचाकीने चालले होते. त्यांची दुचाकी आजगावकरवाडीतील झाराप-पत्रादेवी महामार्गावर आली असता गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अंदाज विजय नार्वेकर यांना आला नाही. त्यांनी दुचाकी रस्त्यातच उभी केली. कारचालक अशोक लक्षे यांनी दुचाकीस पाहिले होते; परंतु कारचा वेग आवरता न आल्याने भरधाव वेगातील कारने (एमएच४३ जे ४२२७) दुचाकीला धडक दिली.
अपघातानंतर दुचाकी सुमारे शंभर ते दीडशे फूट फरफटत गेली, तर विनायक जोशी हे ५० फूट लांब फेकले गेले. यात जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकीचालक विजय यांच्या हात, पाय व डोक्याला दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातानंतर झाराप पत्रादेवी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या महामार्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर गाड्यांच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मृत विनायक जोशी हे मुंबई येथे दूरसंचारमध्ये कामाला होते. अलीकडेच ते गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुले असा परिवार आहे.