मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे कार-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:38 PM2022-05-12T12:38:15+5:302022-05-12T12:38:39+5:30
दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारला समोरून जोरदार धडक
कणकवली/खारेपाटण : मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटण जवळच असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कार-दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. व्हॅनिश हजायॉ डिसोझा (वय २७, रा. कुर्ला, गावठाण मुंबई) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज, गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विदर्भ कोकण ग्रामीण सहकारी बँकेचे रत्नागिरी खेड येथील अधिकारी सुनील सतीश तळवेलकर, सागर नवनाथ गायकवाड, प्रफुल्ल कुमार डंगे, नरेंद्र पांडुरंग चव्हाण, प्रबोध गोपाळ हिंदळेकर हे सर्व कणकवली येथील बँकेची बुधवारची मिटिंग संपवून आज, सकाळी कार क्रमांक (एम.एच.-०५-डी.एस.-३१८३) मधून खेड येथे चालले होते. तर, व्हॅनिश डिसोजा हे आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच.-०३-जे.-१२६६) वरुन गोव्याच्या दिशेने निघाले होते.
दरम्यान, नडगिवे येथे एका अवघड वळणावर दुचाकीस्वार व्हॅनिश डिसोजा याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो जोरदार समोरून येणाऱ्या कार वर आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, उपसरपंच अरुण कर्ले, भावेश कर्ले, सामाजिक कार्यकर्ते भाऊ राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी डिसोझा याला पुढील उपचाराकरिता कणकवली पाठविले. खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी मोहिते यांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरची दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.
महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम पूर्ण करावे
मुंबई - गोवा महामार्गावरील नडगिवे येथील हे अवघड वळण 'वन व्हे ' ठेवण्यात आले असून याठिकाणी वारंवार अपघात घडत आहे. त्यामुळे हे अपूर्ण असलेले रस्त्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण न केल्यास अजूनही येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे. या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.