सावधान..! हृदयविकाराचं वय घटतंय!
By admin | Published: September 23, 2015 10:00 PM2015-09-23T22:00:05+5:302015-09-24T00:08:32+5:30
तिशीतही बसतो धक्का : व्यायामाचा अभाव, तणाव, जंकफूड कारणीभूत--हृदयविकार जागरूकता दिन
प्रकाश वराडकर - रत्नागिरी --व्यायामाचा अभाव व खाण्याच्या सवयींधील बदल, फास्ट फूडचे दुष्परिणाम आणि अनेक प्रकारच्या तणावांमुुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराचे झटके येण्याचे वय हे ३० पर्यंत कमी झाले आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायामाचे महत्व लक्षात घेऊन आपणच आपल्यासाठी सतत धडधडत चालणाऱ्या हृदयाची काळजी घेतली तर आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकेल व दिर्घायुषी होता येईल, असे मत हृदयविकार तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सर्वत्र स्पर्धा आहेच परंतु ती अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे बुध्दिमत्तेचा, कार्यक्षमतेचा कस लागत आहे. बेरोजगारीची समस्या आहे. दैनंदिन जीवनातील समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे स्ट्रेस किवा तणावाच्या वातावरणात सातत्याने वावरावे लागत असल्याने हृदयाचे आरोग्य खालावत चालले आहे. त्यातच धावपळ, दगदग वाढल्याने घरचे जेवण मिळणे कठीण बनले आहे. परिणामी कुठे मिळेल तेथे हॉटेल वा अन्य अन्नपुरवठा केंद्रातील खाद्यपदार्थ सेवन केले जात आहेत. त्याचा दर्जा काय, याचा कोणताही विचार होताना दिसून येत नाही. फायद्याच्या हेतूने काही जंक फूड निर्माते आरोग्याला हानीकारक पदार्थांचा अन्नपदार्थ निर्मितीसाठी वापर करतात. त्याचा परिणाम आरोग्यावर, हृदयावर होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात हृदयविकाराचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयात जेवढ्या संख्येने हृदयविकाराचे रुग्ण दाखल होतात त्यापेक्षा अधिक रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हृदयाची बायपास सर्जरी, अॅँजियोप्लास्टी करून घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी विशेष प्रबोधन मोहीम राबविण्याचीही आवश्यकता भासणार आहे.
जिल्ह्यात गेल्या दीड वर्षाच्या काळात हृदयविकाराचा झटका आलेल्यांची संख्या ७०७ एवढी आहे. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांची संख्या ६७५ होती. तर २०१५-१६ या वर्षाच्या पुर्वार्धात ही संख्या ३२ आहे. आर्थिक क्रयशक्ती असलेले लोक या आजारासाठी खासगी रुग्णालयातून उपचार घेतात. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या वेगळी आहे. २०१३-१४ या वर्षी राजीवगांधी जीवनदायीनी योजना सुरू होती. त्याचा लाभ अनेकांनी घेतला.
शालेय आरोग्य तपासणीत २०१३-१४ या वर्षी ६२ मुलांना हृदयाबाबत समस्या असल्याचे आढळून आले. त्यातील ३२ जणांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. १२ जणांवर औषधोपचार झाले. १६ मुलांचे पालक मुुलांवर शस्त्रक्रीया करण्यास राजी नाहीत. २ मुलांची शस्त्रक्रीया करावयाची आहे. २०१४-१५ मध्ये शालेय आरोग्य तपासणीत ३६ मुले हृदयाच्या समस्येने ग्रासलेली सापडली. त्यातील २६ जणांवर शस्त्रक्रीया झाली. ६ जणांवर औषधोपचार करण्यात आले तर ३ मुलांच्या पालकांनी मुलांवर शस्त्रक्रीयेस विरोध केला. एका मुलावर शस्त्रक्रीया होणे बाकी आहे. २०१५-१६ या वर्षातील गेल्या सहा महिन्यांच्या काळात शालेय आरोग्य तपासणीत ३९ मुलांना हृदयसमस्या असल्याचे समोर आले. त्यातील २६ जणांच्या शस्त्रक्रीया झाल्या. त्यातील २ पालकांनी मुलांवर शस्त्रक्रीयेस नकार दिला. तर ११ जणांवर शस्त्रक्रीया केल्या जाणार आहेत.
अडीच वर्षात ८४ मुलांच्या
हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया
जिल्ह्यात हृदयविकाराची व्याप्ती वाढत चालली आहे. पूर्वी ४० ते ४५ वयानंतर सर्वसाधारणपणे लक्षणे दिसणाऱ्या हृदयविकाराने आता तिसाव्या वर्षातच आपला प्रभाव दाखविण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे ही स्थिती असतानाच लहान मुलांच्या हृदयाबाबतच्या समस्याही वाढल्या आहेत. शालेय विध्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत गेल्या अडीच वर्षात १३७ मुलांना हृदयाबाबत समस्या असल्याचे दिसून आले आहे. त्यातील ८४ जणांवय हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. १८ जणांना औषधोपचार केले गेले. २१ मुलांचे पालक त्यांच्या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यास तयार नाहीत. उर्वरित १४ जणांची शस्त्रक्रिया व्हायची आहे.
तरुण वयातच हृदयविकाराची समस्या गंभीर बनली आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यातील बदल, ताणतणाव यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योग्य आहार, ताण तणावातून बाहेर येणे हे उपाय हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तिसाव्या वर्षीच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे, ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.
- डॉ. प्रल्हाद देवकर,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.