शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:32 PM2020-06-13T15:32:40+5:302020-06-13T15:33:58+5:30
पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.
बांदा : पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.
याठिकाणी नदीपात्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. शेर्ले दशक्रोशीतून बांद्यात येण्यासाठी नदीपात्रात दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानाने साकवाची उभारणी करतात. डिसेंबरमध्ये साकव उभारण्यात येतो.
शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना बांदा शहरात येण्यासाठी इन्सुली आरटीओ नाका येथून ३ किलोमीटर लांबीचा फेरा मारून यावे लागते. शहरात येण्यासाठी नदीपात्रातून हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याठिकाणी गेली कित्येक वर्षे पुलाची मागणी होत होती. पावसाळा संपल्यावर ग्रामस्थ याठिकाणी श्रमदानाने साकव उभारून वाहतुकीची व्यवस्था करतात. पावसाळ्यात शेर्ले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ होडीतून प्रवास करतात.
पहिल्याच पावसात तेरेखोल नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने साकव वाहून गेला. येथून जाणाऱ्या पाईपलाईनचे काम यावर्षी सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद ठेवण्यात आले होते. याठिकाणी पूल उभारल्यास दशक्रोशीतील वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.
सदर पुलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा येथील ग्रामस्थांना आणखीन वर्षभर तरी पुलाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुढच्यावर्षी जीवघेण्या प्रवासातून मुक्तता ?
येथे होणाऱ्या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. यावर्षी पावसाळ्यात चार महिने ग्रामस्थांना होडीचा प्रवास करावा लागणार आहे. पण पुढच्या वर्षी पाईपलाईनचे काम वेळेवर सुरू झाल्यास जीवघेण्या होडी प्रवासातून मुक्तता मिळणार आहे.