तळेरेच्या वनरक्षकाविरुध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: June 4, 2017 01:34 AM2017-06-04T01:34:56+5:302017-06-04T01:34:56+5:30
कणकवली पोलिसात तक्रार
कणकवली : वन विभागाकडील प्रशासकीय काम करून देण्यासाठी ७७ हजार ४१0 रुपये लाच मागितल्याप्रकरणी तळेरेचे वनरक्षक राहुल पाटील याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले दोन महिने संशयित आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हुलकावणी देत आहे. आरोपी सापळ्यात अडकत नसल्यामुळे तक्रारदार मितीश मदन केणी यांनी राहुल पाटील याच्याविरोधात कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
प्रशासकीय काम करून देण्यासाठी वनरक्षक राहुल पाटील हा सुभाष गावकर यांच्याकडे ७७ हजार ४१0 रुपयांची मागणी करीत होता. या प्रकरणी मितीश मदन केणी व सुभाष गावकर यांंनी लाचप्रतिबंधक विभागाला कळविले होते. लाच मागण्याचा प्रकार २४ एप्रिल रोजी सकाळी ११.४0 ते १२.१५ दरम्यान घडला होता. त्याचवेळी सुभाष गावकर व मितीश केणी यांनी लाचलुचपत विभाग कुडाळ यांना कळविले होते. लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मात्र राहुल पाटील याला संशय आल्याने तो फोन बंद करीत असे व ठरविलेल्या ठिकाणी येत नसे व सुभाष गावकर यांचे कामही करून देत नव्हता.