खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:22 PM2019-04-08T18:22:06+5:302019-04-08T18:26:07+5:30
तालुक्यातील कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. विक्रीसाठी आणलेले ५ किलो वजनाचे खवले
कणकवली : तालुक्यातील कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. विक्रीसाठी आणलेले ५ किलो वजनाचे खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या खवल्या मांजराची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. या कारवाई दरम्यान चार संशयित आरोपींसह स्विफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
खवले मांजर तस्करी प्रकरणी गणपत सत्यवान घाडीगांवकर, सचिन पांडुरंग घाडीगांवकर (दोघे रा. दिवा मुंबई ), नवरुद्दीन कादिर शिरगावकर ( रा.मणचे , देवगड ) प्रकाश शांताराम गुरव (गुरववाडी ,रा.साळीस्ते ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
प्रकाश गुरव याने घाडीगांवकर याला हे खवलेमांजर विकले होते.अशी माहिती तपासात पुढे येत आहे.त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
शेड्युल वन मधील अतिदुर्मिळ प्रजाती मध्ये खवल्या मांजराची गणना होते. खवले मांजर विक्रीसाठी काही व्यक्ती कासार्डे येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, स्थानिक गून्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या आणि वनअधिकारी सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
उपनिरीक्षक रविराज फडणीस, सुभाष खांदारे, आंबेरकर, हवालदार राऊत, कृष्णा केसरकर अमित तेली, जॅक्सन, इंगळे, खाडे, कांदळगावकर, प्रतीक्षा कोरगावकर, चालक हवालदार संजय दाभोलकर आदी या कारवाईत सहभागी झाले होते.