‘काजू बी’ने गाठला विक्रमी दर

By Admin | Published: April 17, 2016 10:21 PM2016-04-17T22:21:58+5:302016-04-17T23:56:12+5:30

कर्नाटक, गुजरातमध्ये मागणी: रत्नागिरी जिल्ह्यात काजूवर प्रक्रिया करणारे ८ ते ९ कारखाने

'Cashew B' reached record highs | ‘काजू बी’ने गाठला विक्रमी दर

‘काजू बी’ने गाठला विक्रमी दर

googlenewsNext

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  --हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा फटका काजू पिकाला बसला असल्याने काजू पिकाची उत्पादकता घटली आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीचे दरामध्ये मात्र तेजी आली आहे. सध्या १२० ते १३० रूपये दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. काजूच्या दर्जानुसार दर प्राप्त होत आहे.
जिल्ह््यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी सुमारे एक ते सव्वा लाख मेट्रीक टन काजू उत्पादन होते. यावर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून काजूला मोहोर प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी महिनाभर आधीच काजू बाजारात विक्रीसाठी आला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला काजू बाजारात आला. मात्र हा काजू म्हणावा तेवढ्या प्रमाणात येत नव्हता. त्यामुळे काजूला चांगला भाव मिळाला.गतवर्षी ९० ते १०५ रूपये दराने काजू खरेदी सुरू होती. मात्र, यावर्षी काजूच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंब्याप्रमाणे काजूला पुनर्मोहोर प्रक्रियेला सामोरे जावे लागले. ढगाळ हवामानामुळे काजूपिकावर कीडरोगाचा प्रादूर्भाव झाला. परिणामी उत्पादनात घट झाली.
काजूचे जेमतेम ३० टक्केच पीक यावर्षी मिळणार आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे तर यावर्षी हवामानातील बदलामुळे काजू पिकामध्ये घट झाल्याने बागायतदार चिंतेत आहे.

कर्नाटक, गुजरातमध्ये मागणी
रत्नागिरी जिल्ह्यात काजूवर प्रक्रिया करणारे ८ ते ९ कारखाने सुरू करण्यात आले. मात्र, यातील तीन कारखाने बऱ्यापैकी सुरु आहेत. या तीन कारखान्यांमध्ये जेमतेम ५० हजार टन काजू बीवर प्रक्रिया होते. त्यामुळे कर्नाटक, गुजरात राज्यातील व्यापारी रत्नागिरीत येऊन काजू बी खरेदी करतात. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये काजू बी खरेदी केली जाते. त्यानंतर वर्षभर त्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, भांडवलाअभावी स्थानिक प्रकल्पांना जेमतेम व्यवसाय चालवावा लागतो. अन्य राज्यांमधील व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत असल्याने जिल्ह््यातील कारखान्यांनासुध्दा तोच भाव द्यावा लागत आहे.
परदेशातील काजूवर एक्साईज ड्युटी
रत्नागिरी जिल्ह््यातील काजूपेक्षा आफ्रिकेतील काजू स्वस्त पडतो. यामध्ये किलो मागे दहा रूपयांचा फरक आढळतो. जिल्ह््यातील काजू ओलसर असल्याने तो वाळवण्यासाठी मनुष्यबळ खर्ची घालावे लागते. त्यापेक्षा परदेशातील काजू ‘ड्राय’ असतो. तसेच तो केव्हाही खरेदी करता येऊ शकतो. त्यासाठी भांडवलाची गुंतवणूक करून ठेवावी लागत नाही. रत्नागिरी जिल्ह््यात पिकणाऱ्या काजूला अन्य राज्यांमध्ये मागणी आहे. त्याचप्रमाणे कारखानादारांकडूनही परदेशातील काजूला अधिक पसंती आजपर्यंत मिळत होती. मात्र, यावर्षीपासून काजू आयातीवर एक्साईज ड्युटी लावण्यात आल्याने परदेशातून काजू खरेदी करणे व्यापाऱ्यांना महाग पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य काजू उत्पादनात प्रथम क्रमांकावर असले तरी निर्यातीत मात्र ते चौथ्या क्रमांकावर आहे. कोकणातील काजू हा चवीने व आकाराने चांगला व उत्तम प्रतीचा असल्याने या काजूला अधिक मागणी आहे.भारतात १६ लाख टन काजू बीवर प्रक्रिया केली जाते. पैकी ५० टक्के काजू हा स्थानिक तर उर्वरित ५० टक्के काजू परदेशातून आयात करण्यात येतो. परंतु, यावर्षी आयातीवर एक्साईज ड्युटी लावल्याने परदेशातील काजू खरेदी महागडी ठरणार आहे. यावर्षी काजू एक महिना आधीच बाजारात आला आहे. उत्पादनात घट झाल्याने खरेदीचा दरही वधारला आहे. त्यामुळे प्रक्रियेनंतरच्या काजूचे दर वधारण्याची शक्यता आहे. काजूच्या दर्जानुसार ५५० ते १००० रूपये किलो दराने काजूगर विकण्यात येतात. परंतु, या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे.
जयवंत विचारे,
अध्यक्ष , रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्या., गवाणे.

Web Title: 'Cashew B' reached record highs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.