जातनिहाय सर्वेक्षणात बौद्धांचा स्वतंत्र समावेश व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2015 10:18 PM2015-04-17T22:18:14+5:302015-04-18T00:10:13+5:30
रिपब्लिकन पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन केले सादर
रत्नागिरी : सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण २०११ च्या प्रारूप यादीमध्ये बौद्ध बाधवांचा स्वतंत्र समावेश व्हावा, अशी मागणी येथील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
भारताच्या २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १७ लाख इतकी आहे. त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या ६६,९४८ इतकी नोंदवली गेलेली आहे. वास्तविक जिल्ह्यात २ लाख ४५ हजार इतकी लोकसंख्या असून त्यापैकी बौद्ध समाजाची २ लाख २५ हजार इतकी आहे. जातनिहाय सर्वेक्षणच्या प्रारूप याद्यांबाबत चौकशी केली असता रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के बौद्धांची नोंद हिंदू म्हणून करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
या तफावतीमुळे जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विकासात्मक बाबींवर दूरगामी गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे बौद्ध बांधवांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून तशी सुधारित नोंद या जातनिहाय सर्वेक्षणाच्या प्रारूप यादीमध्ये करण्यात यावी, तसेच दावे व आक्षेप दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे करण्यात आली आहे.
याप्रकरणी संघटनेने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. संघटनेच्या निवेदनावर सकारात्मकरित्या विचार करून शासनाकडून मार्गदर्शन मागवून पुढील कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या शिष्टमंडळात जे. पी. जाधव यांच्यासह रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष रजत पवार, सरचिटणीस दीपक जाधव, सहसचिव सुजित चवेकर, तालुका युवाध्यक्ष उमेश कदम, युवा संघटक नरेश कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बौद्ध धर्मियांनी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये जावून सुधारित माहिती तत्काळ नमूद करावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)