खडू धरलेला आमदार हवा
By admin | Published: February 23, 2015 09:49 PM2015-02-23T21:49:25+5:302015-02-24T00:01:59+5:30
ज्ञानेश्वर कानडे : माध्यमिक अध्यापक संघ अधिवेशन
टेंभ्ये : विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे प्रत्यक्षात हातात खडू धरलेले असावेत. शिक्षक म्हणून काम केलेला आमदारच शिक्षकांच्या व्यथा समजावून घेऊ शकतो. शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी शिक्षक आमदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी शिक्षकांची व्यथा अनुभवणे गरजेचे असल्याचे माध्यमिक अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी स्पष्ट केले.माध्यमिक अध्यापक संघाच्या वार्षिक अधिवेशात ते बोलत होते. सध्या शिक्षण क्षेत्रासमोर असणाऱ्या विविध समस्या त्यांनी सभागृहासमोर मांडल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, कॉ. गोविंद पानसरे व अन्य दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार शिवाजीदादा पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, ज्येष्ठ शिक्षक नेते सदाशिव चावरे, राम पाटील, बी. डी. पाटील, अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण सभापती व अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, लक्ष्मण पावसकर, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे कार्यवाह अशोक आलमान, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष जगन्नाथ वीरकर, तालुका अध्यक्ष सी. एस. पाटील, कार्यवाह सागर पाटील, एमसीसी समादेशक कदम, विज्ञान पर्यवेक्षक नरेंद्र गावंड, कोकण मंडळ सदस्य रामचंद्र महाडिक उपस्थित होते.
सी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल परीक्षा विभागप्रमुख एकनाथ पाटील यांनी जाहीर केला. शिक्षकांसमोरील समस्या सोडवण्यासाठी संघटना हा एकच पर्याय असल्याचे उद्घाटक शिवाजीदादा पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाकडे मागितल्याशिवाय काहीही मिळणार नाही. संघटनात्मक शक्तीच शिक्षकाला न्याय देऊ शकते, असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, गुरुनाथ पेडणेकर, सदाशिव चावरे, राम पाटील, बी. डी. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत घुले यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, तालुक्यातील पुरस्कारप्राप्त, पदोन्नतीप्राप्त, सेवानिवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अशोक आलमान यांनी आभार मानले. आय. आय. सिद्धिकी, सागर पाटील, सचिन मिरगल यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)