Sindhudurg: 'सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा ', हत्तीआपद्ग्रस्तांची उपवनसंरक्षकांना आर्त साद
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 3, 2024 06:45 PM2024-07-03T18:45:17+5:302024-07-03T18:45:41+5:30
हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम
वैभव साळकर
दोडामार्ग : सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा, अशी आर्त विनवणी केर-मोर्ले परिसरातील हत्तीआपदग्रस्तांनी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांना केली. मंगळवारी त्यांनी वनाधिकाऱ्यांसह हत्तीनुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर रेड्डी यांनी तुमची मागणी शासनापर्यंत पोहोच; पण त्याचबरोबर तुमच्या मागण्यांबाबत काय पाठपुरावा केला हे दर पंधरा दिवसांनी तुम्हाला वनाधिकारी गावात येऊन कळवतील, असे आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत दोडामार्ग वनक्षेत्रपाल व्ही.एस. मंडल, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी हत्ती पकड या प्रमुख मोहिमेसह शेतकरी विमा, पंचनामा क्लिष्ट बाबी, वाढीव नुकसानभरपाई, समाविष्ट नसलेली पिके, शेतकरी शेतीत जात नसल्याने होणारे नुकसान, प्रतिकुटुंब अनुदान, सोलार- पथदीप, लघुउद्योग निर्मिती, फळबाग लागवड अनुदान यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वन विभागाने सातत्य ठेवावे
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी थेट शेती नुकसानीपर्यंत पोहोचण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, यात सातत्य ठेवून जेव्हा वन विभाग शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करून दिलासा देईल त्याचवेळी आमचे खरे समाधान होईल, अशी भावना व्यक्त केली.
हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम
सध्या हत्ती गावठाण क्षेत्रात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली. रेड्डी यांनी हे अंतरही पाहिले. ग्रामस्थांनी हत्तींना तिलारी बुडीत क्षेत्रापर्यंत न्या, अशी मागणी केली. त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, पावसाळी हंगामातील अडचणीवर चर्चेअंती पाऊस कमी झाल्यावर याबाबतीत निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.