‘महाकबड्डी’साठी खेडही प्रयत्नशील ?
By admin | Published: March 11, 2015 11:22 PM2015-03-11T23:22:15+5:302015-03-12T00:03:15+5:30
क्रीडारसिकांना पर्वणी : ‘पशुपतीनाथ ग्रुप’तर्फे होणार स्पर्धेचे आयोजन
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिडा शौकिनांना मे महिन्यात राज्यस्तरीय महाकबड्डी लिग स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशन आणि पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुृप आॅफ कंपनी यांच्यातील चर्चेनंतर या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे. विशेषत: खेडमध्ये या स्पर्धा घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत़ खेड येथे झालेल्या या संघटनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत सहमती असल्याचे सांगण्यात आले.या स्पर्धा १ ते २३ मेदरम्यान आयोजित करण्यात आल्या असून रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डी संघ पुणे येथील पशुपतीनाथ कंपनीने पुरस्कृत केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष अजय चिंगळे यांच्यावतीने सिध्दार्थ मेहता आणि कंपनीचे संचालक शशांक कदम तसेच सचिन चव्हाण यांनी दिली आहे़
पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुप आॅफ कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य कबड्डी फेडरेशनशी कंपनीची बोलणी झाल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. क्रिकेटच्या धर्तीवर महाराष्ट्रात अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापुर, बारामती, नाशिक, रायगड, रत्नागिरी आदी १२ संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्य, राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हे सर्व संघ पुरस्कुत केलेले आहेत. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना चांगले उत्पन्न कमावण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. कोकणातील लाल मातीतला हा खेळ असल्याने या स्पर्धा कोकणामध्ये झाल्या पाहिजेत, असा आग्रह कंपनीचा असल्याचे संचालक शशांक कदम यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचा संघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नव्हता़ पशुपतीनाथ कंपनीनी हा संघ पुरस्कृत केला आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांस ७ लाख रूपयांचे पारितोषिक आणि सुवर्णचषक तसेच उपविजेत्यास ५ लाख रूपये आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून लवकरच हा संघ पुरस्कृत करण्याबाबत पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत पशुपतीनाथ कंपनीचे संचालक शशांक कदम, सचिन चव्हाण यांच्यासह सिध्दार्थ मेहता, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद भोसले, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महिला संघाकडे
साऱ्यांचीच पाठ
रत्नागिरी जिल्ह्याचा पुरूषांचा संघ पुरूस्कृत करण्यात आला असला, तरी आजपर्यंत महिला संघाकडे मात्र साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा महिलांचा सघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नाही. मात्र, हा संघ पुरस्कृत करण्याच्या प्रतीक्षेत येथील काही उद्योजक आहेत.