खाडीतील गाळाने घोटला मासेमारीचा गळा
By admin | Published: September 21, 2015 09:32 PM2015-09-21T21:32:04+5:302015-09-21T23:45:52+5:30
मच्छीमारांचे नुकसान : वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे राजीवड्यातील प्रश्न बिकट
रत्नागिरी : भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर गाळाने भरल्याने खोल समुद्रामध्ये जाण्याचा मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला आहे. त्यामुळे अनेकदा नौकांना गाळामुळे अपघात होऊन मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करुन ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छीमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न नेहमीच मच्छीमारांना सतावत आहे. भाट्ये खाडीच्या आसपास असलेली राजिवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमधील हजारो लोक मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील बहुतांशी कुटुंबिय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गाळ गेली कित्येक वर्षे उपसलेलाच नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छीमारांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. येथे मासेमारी नौका बुडाल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भरलेल्या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे मत्स्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे शासन कधी लक्ष देणार? असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर)
भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे.
- शब्बीर भाटकर
माजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.
कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार.