मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच!
By Admin | Published: March 28, 2016 11:02 PM2016-03-28T23:02:48+5:302016-03-29T00:26:07+5:30
केदार गावकर मृत्यूप्रकरण : गुदमरून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज, ‘त्या’ युवतीची कसून चौकशी
मालवण : मालवण-वेंगुर्ले सागरी महामार्गावरील देवली येथील माळरानावर रविवारी दुपारी आढळून आलेल्या मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते केदार सुरेंद्र गावकर (वय ३५) यांच्या मृतदेहाबाबत मालवण शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. केदार याचा मृत्यू गळफास लागून झाला. वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासानुसार ती गळफास लावून आत्महत्या होती, असे मालवण पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केदार याच्या सोबत असलेल्या 'त्या' युवतीची कसून चौकशी करण्यात आली असून तिचा जबाब नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार केदार याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार व काही मित्रपरिवाराच्या जबाबानुसार आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली का ? की प्रेमप्रकरणातूनच त्याने गळफास लावला, याचाही उलगडा करण्याचे आव्हान मालवण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
दरम्यान, घटनास्थळी केदार याच्या समवेत असलेल्या 'त्या' युवतीची सोमवारी सकाळी मालवण पोलिसांनी सकाळी तीन तास चौकशी केली. त्या युवतीनेही जबाबात केदार याने गळफास लावल्यानंतर त्याच्या मित्रांशी संपर्क साधून माहिती दिल्याचे म्हटले आहे. केदार याच्या मृत्यूबाबत मालवणात दुसऱ्या दिवशीही आत्महत्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.
केदार याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपल्याला देवली येथे बोलावले होते. आपली ही शेवटची भेट आहे, असे सांगत केदारने आपला मोबाईल बंद केला. तसेच आपण कधी भेटणार नाही त्यामुळे केदारने काहीतरी गिफ्ट मागितले. आपल्याकडे गिफ्ट काहीच नसल्याने केदार याने आपल्याकडील स्कार्फ ओढून घेतला.
त्यावेळी आपल्या गळ्यातील साखळीही तुटली. त्यानंतर तू पुढे हो, आपण मागाहून येतो असे सांगत आपल्याला जाण्यास सांगितले. बराच वेळ झाला तरी केदार न आल्याने पुन्हा मागे परतली असता केदार गळफास लावलेल्या स्थितीत तडफडत असल्याचा दिसून आला. तेव्हा त्याने गळफास लावलेला स्कार्फ दाताने तोडून त्याला खाली काढले व त्याच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांना फोन करून केदार याने गळफास लावल्याचे माहिती युवतीने चौकशीदरम्यान दिली, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
युवतीची माहिती : ‘माझा’ वाढदिवसच साजरा होणार नाही
पोलीस जबाबात 'त्या' युवतीने आपला वाढदिवस तीन मार्च रोजी झाल्याचे सांगितले. तर ४ मार्च रोजी केदार याची भेट झाली तेव्हा त्याने 'तुझ्या वाढदिवसाला मी शुभेच्छा दिल्या. माझा वाढदिवस २९ मार्चला आहे. त्यादिवशी तूच काय अन्य कोणीही मला शुभेच्छा देवू शकणार नाहीत 'असे सांगितल्याचे 'त्या' युवतीने पोलीस तपासात स्पष्ट केले. तसेच आपल्याकडे असलेली गाडीही केदार याने दिली असून ती त्याच्या एका मित्राच्या नावावर आहे, असेही त्या युवतीने सांगितले. तर केदार याच्या पत्नीसोबत काही दिवसांपूर्वी वादही झाल्याचे तपासात नोंद करण्यात आले आहे.
गळफासानेच मृत्यू...?
केदार याचा मृत्यू गळफासानेच झाला आहे. त्याच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव अथवा दारूचा अंश सापडून आला नाही. तसेच त्याच्या शरीरावर कोणत्याही स्वरुपात मारहाणीच्या अथवा झटापटीच्या खुणा नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. याबाबत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. केदार याचा मुंबईत राहणाऱ्या मित्राच्या मालवण येथील अनेक खरेदी-विक्री व्यवहारात केदार याचा सहभाग होता. देवली येथील आंबा बागही त्या मित्राचीच होती. तो मित्र आज सायंकाळी मालवण येणार असून त्याचाही जबाबही नोंद करण्यात येणार असल्याचे पोलिसानी सांगितले आहे.