रत्नागिरी रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Published: May 29, 2016 12:24 AM2016-05-29T00:24:35+5:302016-05-29T00:29:09+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते आज उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन आज (शनिवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी स्थानकात तीन प्लॅटफॉर्मसह आरक्षण कार्यालय आणि परिसरात पंचवीस ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. त्यातील प्लॅटफॉर्मवर एकूण १५ कॅमेरे बसविले आहेत. वाढती गर्दी, चोऱ्या यासह गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा वापर होणार आहे. या सर्वांची हाताळणी रेल्वे पोलीस दलाच्या कार्यालयातून होणार आहे. ही यंत्रणा मडगाव येथील मुख्य कार्यालयातील सर्व्हरशी जोडण्यात आली आहे. गोवा येथून यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. रेकॉर्डींग तीस दिवस राहिल अशी व्यवस्था आहे. काळोखातील चित्रण सहजरित्या करता येईल अशी त्या कॅमेराची रेंज आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेता वॉच ठेवणे गरजेचे आहे. चार ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. रत्नागिरी पाठोपाठ आठ दिवसात खेडमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होईल. एकोणीस ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)