प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
By admin | Published: December 4, 2014 11:04 PM2014-12-04T23:04:52+5:302014-12-04T23:39:19+5:30
आरोग्य समिती सभेत निर्णय : अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी आरोग्य समिती सभेत याची मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत पाठविण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, भारती चव्हाण, जान्हवी सावंत, रेश्मा जोशी, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रे आदींमधील डॉक्टर्सना सातत्याने मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण आदींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला आहे. या निर्णयाला अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून ४२ लाख रुपयांच्या निधीची जादा मागणी करण्यात आली. यात साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी २४ लाख ६५० रुपये, कंत्राटी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांसाठी ३ लाख २४ हजार रुपये, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या पगारासाठी १५ लाख रुपये अशा एकूण ४२ लाख ४४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत कुटुंबकल्याणअंतर्गत ४६ टक्के काम पूर्ण झाले आहे तर लसीकरणाचे ५० टक्के एवढे काम झाले आहे.
क्षयरोगअंतर्गत ११२५ थुंकी नमुने तपासण्यात आले. यात ३५ नमुने दूषित आढळले आहेत तर एचआयव्हीअंतर्गत ३८ रुग्ण आहेत तर कुष्ठरोगाचे ६१ रुग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती सभेत देण्यात आली तर मलेरियाचे आतापर्यंत १३६ रुग्ण तर डेंग्यूचे ४९ संशयित रुग्ण आढळले होते. तसेच १६ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत. आतापर्यंत ६५ रुग्ण डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण जिल्ह्याबाहेर डेंग्यूची लागण झाल्याचे तर ४ रुग्णांना जिल्ह्यातच डेंग्यूची लागण झाल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाले असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
बांधकामे अपूर्ण असलेली आरोग्यकेंद्रे व उपकेंद्रे आदींची कामे प्रथम पूर्ण करावीत तसेच दुरुस्तीचीही कामे तत्काळ पूर्ण करावीत असे आदेश सभापती पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयी असल्याचा आरोप जान्हवी सावंत यांनी केला. तर सभागृहाच्या भावना पोलीस अधीक्षकांना कळविण्याच्या सूचना पेडणेकर यांनी केल्या. (प्रतिनिधी)