कणकवलीतील उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे धोकादायक, आमदार नितेश राणेंनी तातडीने केल्या सूचना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 1, 2022 02:12 PM2022-10-01T14:12:07+5:302022-10-01T14:12:36+5:30
हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती
कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खालील भागात ब्रिजच्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे लोकांच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवितहानी होण्याची भीती आहे. याबाबतची वस्तुस्थिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आमदार नितेश आणि प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या समक्ष सदर पत्रे हटविण्याबाबत सूचना केल्या.
फ्लाय ओव्हर ब्रिजवरील पाणी पाईपद्वारे पिलर जवळ पडण्याची गरज आहे. परंतु हे पाणी सर्विस रस्त्यांवर धबधब्या सदृश्य पडत असल्याने पादचारी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार लक्ष वेधून ही महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. याकडे देखील नलावडे यांनी राणे यांचे लक्ष वेधले. त्यामुळे यासंदर्भात महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घ्यायला भाग पाडा अशी मागणीही नलावडे यांनी केली.
दरम्यान आमदार राणे यांनी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांना तातडीने सूचना करत येथील धोकादायक पत्र्याचा स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो देखील घेतला. कणकवली शहरात असे चार ते पाच ठिकाणी पत्रे अडकलेल्या स्थितीत असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या संबंधितांना सूचना द्या असेही अधिकाऱ्यांना सांगितले.