किल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धापन दिन साजरा, थरारक मर्दानी खेळांची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:13 PM2018-04-02T15:13:55+5:302018-04-02T15:13:55+5:30
मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन तर किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा आणि थरारक मर्दानी खेळाच्या सलामीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मालवण : मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन तर किल्ले सिंधुदुर्गातील शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा आणि थरारक मर्दानी खेळाच्या सलामीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीस ३५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत आणि मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
सकाळी ७ वाजता दांडी-वायरी किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा याठिकाणी वायरी सरपंच घन:श्याम ढोके यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिची पूजा करण्यात आली.
मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप नेते व शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले. मालवण किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर परिसरात मर्दानी खेळांची सलामी देण्यात आली.
यावेळी तहसीलदार समीर घारे, भाजप नेते अतुल रावराणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा ज्योती तोरसकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आपा लुडबे, गणेश कुशे, भाऊ सामंत, मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ, दत्तात्रय नेरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, बबलू राऊत, महेश मांजरेकर, रविकिरण आपटे, विकी तोरसकर, हेमंत वालकर, सूर्यकांत फणसेकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, डॉ. एम. आर. खोत, नंदकुमार घाडी, प्रदीप मयेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्य शिला लुडबे, कविता मोंडकर, संगीता चव्हाण, विरेश नाईक आदी उपस्थित होते.
मंदिरात आयोजित कार्यक्रमात किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या सिंधुदुर्ग- प्राचीन अर्वाचीन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद जठार म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून लवकरच याबाबतचा आराखडा निश्चित करून कामही सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ऐतिहासिक स्थळांची माहिती सर्वदूर पोहोचावी
तहसीलदार समीर घारे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. त्याचप्रमाणे किल्ल्याबरोबरच किल्ल्याशी संबंधित असणाऱ्या मालवणमधील इतर ऐतिहासिक स्थळांकडेही लक्ष देणे गरजेचे असून त्यांचेही संवर्धन करून या स्थळांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे असेही घारे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. शिवराजेश्वर मंदिराच्या परिसरात न्यू शिवाजी ब्रिगेड, कोल्हापूर यांच्या पथकाने विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करीत शिवरायांना सलामी दिली.