भुयारी रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास केंद्राची मंजुरी, अध्यादेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 06:49 PM2020-06-26T18:49:27+5:302020-06-26T18:51:23+5:30
कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वैभववाडी : कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे रेल्वेफाटक आहे. कोकण रेल्वे मार्गावर दरदिवशी रेल्वे गाड्यांच्या सुमारे ४४ ते ५० फेऱ्या होतात. त्यामुळे हा मार्ग दिवसभरात सुमारे चौदा ते सोळा तास बंद राहतो. याशिवाय उन्हाळी सुटी तसेच गणेशोत्सव, दिवाळी, नाताळच्या जादा गाड्यांमुळे त्याहून अधिक काळ फाटकामुळे हा मार्ग बंद राहतो. त्यामुळे कोकिसरेतील रेल्वेफाटक वाहनचालकांना नकोसे झाले आहे.
त्या अनुषंगाने २००८ पासून कोकिसरे रेल्वेफाटकाला पर्यायी मार्ग व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पक्षाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडून रेल्वेफाटकाचा मुद्दा उचलून धरला. कालांतराने रेल्वे फाटकालगत उड्डाण पुलाचा पर्याय पुढे आला. परंतु उड्डाणपुलाचा पर्याय भौगोलिकदृष्ट्या अवघड असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले.
त्यानंतर रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या संयुक्त पाहणीअंती जठार यांनी भुयारी मार्गाचा पर्याय दिला. त्यावर दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचे एकमत झाले. या भुयारी मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर शासनाने या भुयारी मार्गाचे बांधकाम व जोडरस्त्यांसाठी ६४ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या भुयारी मार्गासाठी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत २.२ किलोमीटर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. यासंबंधी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला आता केंद्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६(जी) या महामार्गावर १०.८ किलोमीटर ते १३ किलोमीटर या अंतरातील जमीन संपादित करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुप्रतीक्षित कोकिसरे भुयारी मागार्चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
दोन महिन्यांत भूसंपादन
यामध्ये भूसंपादन प्रक्रियेचे दोन टप्पे असतात, ते पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले जातील. तसेच भुयारी मार्गाच्या कामाची निविदाही काढण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर विभागाच्या उपअभियंता पूजा बारटक्के यांनी सांगितले.