केंद्राकडून निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद
By Admin | Published: November 20, 2015 09:13 PM2015-11-20T21:13:56+5:302015-11-21T00:25:04+5:30
स्वप्न धुसर
सिंधुुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १०० टक्के निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना दिला जाणारा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ केंद्र शासनाने बंद केल्यामुळे या पुरस्काराअंतर्गत ग्रामपंचातींना मिळणारी लाखो रुपयांची रक्कम बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्मल होणाऱ्या ९२ ग्रामपंचायतींना याचा फटका बसला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छताबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सन २००३ पासून निर्मलग्राम पुरस्कार योजना केंद्र शासनामार्फ त राबवण्यात येत होती. ज्या ग्रामपंचायती निर्मल होतील त्यांना शासनाच्यावतीने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्काराची रक्कम दिली जात होती. यामध्ये १ हजारपेक्षा कमी लोकसंख्येस १ लाख रक्कम, दोन हजारापर्यंत २ लाख रूपये व १० हजार लोकसंख्येमागे १० लाख रूपये असे या बक्षीसाचे स्वरूप होते. ही सर्व रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात येत होती. ही रक्कम विकास योजनांवर खर्च करण्यात येत होती. जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायती या निर्मल ग्राम झाल्या असून ९२ ग्रामपंचायतीचा निर्मल होणे बाकी आहे.त्यांना आता बक्षीसाच्या रकमेचा लाभ मिळणार नाही. (प्रतिनिधी)
स्वप्न धुसर
कें द्र शासनाने निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या रोख रक्कमरूपी पुरस्काराची योजना बंद केल्याने जिल्ह्यातील निर्मल होणे बाकी असलेल्या ९२ ग्रामपंचायती निर्मल होण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतील की नाही यात शंका निर्माण होत आहे. निर्मल झालेल्या ७८.७० टक्के ग्रामपंचायतींनी पुरस्कारांच्या आशेने या ग्रामपंचायती निर्मल केल्या. मात्र शासनाने निर्मलग्राम पुरस्कार योजनाच बंद केल्याने जिल्हा निर्मल होण्याचे स्वप्न जवळ जवळ भंगले आहे.