संचमान्यतेचे निकष जाहीर

By Admin | Published: August 30, 2015 10:50 PM2015-08-30T22:50:13+5:302015-08-30T22:50:13+5:30

तुकडी पद्धत बंद : शिक्षक हवा असेल तर वर्गखोली बांधा!

Certification criteria declared | संचमान्यतेचे निकष जाहीर

संचमान्यतेचे निकष जाहीर

googlenewsNext

सागर पाटील - टेंभ्ये  -प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रलंबीत संच मान्यता करण्याबाबतचे निकष शासनाने नुकतेच जाहीर केले आहेत. या पद्धतीनुसार तुकडी पद्धत बंद करण्यात आली असून, नैसर्गिक वाढ देखील थांबविण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येच्या निकषावर शिक्षक मंजूर करण्याचे नवीन धोरण राज्य शासनाने अंमलात आणले आहे. राज्यातील माध्यमिक शाळा बंद करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे संघटनात्मक स्तरावरुन बोलले जात आहे. नवीन शिक्षक अनुज्ञेय होण्यासाठी वर्गखोली बंधनकारक करण्यात आली आहे.प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत. पहिली ते चौथी अथवा पाचवीपर्यंतच्या वर्गांना ६० विद्यार्थ्यांपर्यंत २ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. त्याच्या पुढे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनुज्ञेय राहणार आहे. जुन्या शाळांमध्ये १३५ पेक्षा अधिक व नवीन शाळांमध्ये १५० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मिळणार आहे. उच्च प्राथमिक शाळा म्हणजे पाचवी ते सातवी अथवा सहावी ते आठवीच्या जुन्या शाळांमध्ये ३६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. १०५ पेक्षा अधिक पटसंख्या झाल्यास त्यापुढे ३५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक मिळणार आहे. या शाळांमध्ये ९० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापक पद मंजूर होणार आहे.नववी, दहावीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळांसाठी दोन वर्ग मिळून ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. दोन वर्गांसाठी ३ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. कोणत्याही नवीन वर्गात ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक जादा शिक्षकपद अनुज्ञेय राहणार आहे. नवीन शाळेसाठी नववीचा वर्ग ४० विद्यार्थ्यांचा असणे आवश्यक आहे. शाळेचा स्तर निश्चित करताना पहिली ते सातवी, पहिली ते आठवी, पहिली ते दहावी, पहिली ते बारावी, पाचवी ते दहावी, सहावी ते दहावी, पाचवी ते बारावी, सहावी ते बारावी, आठवी ते बारावी, नववी ते बारावी अशाप्रकारे करण्यात आले आहेत. या स्तरांमध्ये वरिष्ठ स्तरासाठी मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असणार आहे.नवीन शिक्षक पदाला मान्यता देताना प्रत्येक शिक्षकासाठी स्वतंत्र वर्गखोली आवश्यक आहे. वर्गखोली उपलब्ध नसेल तर शिक्षकाला मान्यता देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे.


निकष बदलावे लागतील : कानडे
संच मान्यतेसंदर्भात निश्चित करण्यात आलेले निकष माध्यमिक शाळांच्यादृष्टीने घातक आहेत. तुकडी पद्धत बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. ग्रामीण भागातील शाळांना विद्यार्थी संख्येची अट पूर्ण करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वाढ बंद केल्याने शिक्षक संख्येमध्ये घट होणार आहे. भाषा, गणित/विज्ञान व समाजशास्त्र या विषयांसाठी शिक्षक निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, विशेष शिक्षकांबाबत कोणतीही तरतूद या आदेशात नाही. कार्यभार निश्चितीबाबत कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. याबाबतची खंत माध्यमिक अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी व्यक्त केली.

माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक पद धोक्यात
नवीन संचमान्यता निकषानुसार माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक पद धोक्यात आले आहे. या निर्णयानुसार सध्या सुरु असणाऱ्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असणार नाही. जिल्ह्यात अशा शाळांचे प्रमाण अधिक असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदच राहणार नाही. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विविध संयुक्त शाळांच्या प्रकारामध्ये इयत्ता आठवी ते दहावी हा प्रकारच नोंदविण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रकारच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे.

Web Title: Certification criteria declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.