चिपळूणमध्ये पावणेनऊ कोटींचे केटामाईन जप्त
By admin | Published: June 15, 2017 11:05 PM2017-06-15T23:05:13+5:302017-06-15T23:05:13+5:30
चिपळूणमध्ये पावणेनऊ कोटींचे केटामाईन जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी/चिपळूण : चिपळूण शहरात केटामाईन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अधिकच असल्याचे पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या मंगेश दीपक कदम (रा. मोरवंड पिंपळवाडी, ता. खेड) याच्या घरातून पुन्हा ५ किलो ८८० ग्रॅम केटामाईन जप्त केले आहे. त्यामुळे जप्त केलेल्या एकूण केटामाईनची किंमत ८ कोटी ७७ लाख २० हजार रुपयांपर्यंत गेली आहे.
याप्रकरणात अजूनही काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता असून, त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, चिपळूण एसटी स्टँडच्या मागे एक व्यक्ती केटामाईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल वाय. पी. नार्वेकर यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. दुपारच्या वेळेत संतोष हरी कदम केटामाईन घेऊन आला. त्याच्याकडून सुमारे ४ कोटी रुपयांचे ५ किलो ८५ ग्रॅम केटामाईन जप्त केले.
संतोष कदम याला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यात स्वप्निल वासुदेव खोचरे (वय २७, रा. पेठमाप चिपळूण) व मंगेश दीपक कदम (२० रा. खेड) या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या दोघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. बुधवारी पोलिसांनी मंगेश कदमच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात पोलिसांनी तब्बल ५ किलो ८८० ग्रॅम केटामाईन जप्त केले. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी १० किलो ९६५ ग्रॅम इतके म्हणजेच सुमारे ८ कोटी ७७ लाख रुपयांचे केटामाईन जप्त केले असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.
मटका रडारवर
अमली पदार्थसोबत जिल्ह्यात राजरोसपणे सुरू
असलेल्या मटका धंद्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यावर चाप बसविणार असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.
जेवणाच्या डब्यातून केटामाईन
केटामाईन प्रकरणात अटक झालेला
मंगेश कदम हा सुप्रिया लाईफ सायन्स
लि. कंपनी लोटे याठिकाणी सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान कामाला होता. त्यावेळी जेवणाच्या डब्यातून त्याने चार वेळा आणि
सॅकमधून तीनवेळा असा मिळून १०
किलो ९६५ ग्रॅमचा केटामाईन हा
अमली पदार्थ आणल्याचे तपासात
पुढे आले आहे.