कणकवली कृषी विभागाविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 08:26 PM2018-01-01T20:26:06+5:302018-01-01T20:26:14+5:30
कणकवली : कणकवली तालुका कृषी कार्यालयांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पूजा परब, कमलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पॉवर विडरचे अनुदान पॉवर टिलरप्रमाणे १९ हजार रुपये देण्यात आले. हे अनुदान खरेदीच्या ५० टक्के प्रमाणे ५५ ते ६० हजार रुपये मिळण्याची गरज होती. त्याविरोधात तालुका कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी साखळी उपोषण केले. त्यानंतर पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनुदान मिळण्याच्या दृष्टीने लेखी आश्वासन देण्याची सूचना कृषी अधिकाऱ्यांना केली.
उपोषणाला बसलेल्या समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत बाधित शेतकऱ्यांसमवेत पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच अफरोजा नावलेकर, माजी सरपंच संजय पाटील, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, गणेश खोत, पूजा परब, कमलेश पाटील, विनायक दळवी, प्रकाश पाटील, भाई मोरजकर, प्रकाश बागवे, विजय टक्के, कोरगावकर आदी सहभागी झाले होते. या उपोषणकर्त्यांनी सकाळी १० वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांनी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान असल्याचे सांगून प्रस्ताव केले. त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मग मंजुरी देताना फक्त १९ हजार रुपये कशासाठी? ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे. अधिकाऱ्यांच्या अज्ञानपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याला जबाबदार कोण? अशा शब्दात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
उपोषणकर्त्यांनी 'अधिकाऱ्यांनी घातला घोळ, सर्व अनुदानाचा लावला बट्याबोळ, बंद करा...बंद करा..शेतकऱ्यांची फसवणुक बंद करा, उन्नत शेती समृद्ध शेतकरी... अज्ञान अधिकारी कंगाल शेतकरी, कृषी विभागाचा जाहीर निषेध, शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच पाहीजे असे मुद्दे लिहिलेले फलक उपोषणस्थळी लावण्यात आले होते
तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी पाचपुते, विभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर येत्या ४५ दिवसात उर्वरीत अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिले . त्यानंतर उपोषणकर्त्यांनी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उपोषण मागे घेतले.
दरम्यान, याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान होवु नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शेतकऱ्याला १९ हजाराचे अनुदान देण्यात आलेले आहे. समृद्ध शेतकरी मोहीमेतील सर्व शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. निकषानुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा होता तो दिलेला आहे. अधिकचे अनुदान पुढील ४५ दिवसात देण्यात येणार आहे. त्याबाबत कृषी विभागामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.