सभापतींचा अधिकारी वर्गावर अंकुश नाही
By admin | Published: June 20, 2014 11:09 PM2014-06-20T23:09:44+5:302014-06-20T23:12:06+5:30
कुडाळ पंचायत समिती सभा : अतुल बंगे यांचा आरोप
कुडाळ : गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत पंचायत समिती सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना, समस्यांना येथील अधिकारी वर्गाकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत, समस्याही सुटल्या नाहीत. येथील अधिकारी वर्गावर सभापती, उपसभापती यांचा कोणताही अंकुश नाही. त्यामुळेच पंचायत समितीच्या कारभारात काहीच सुधारणा झाली नाही, असे आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यानी मासिक बैठकीत करून घरचा आहेर दिला.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात उपसभापती बबन बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती सदस्य, संबंधित विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्यांनी विविध प्रश्न, समस्या याबाबत संबंधित विभागांना धारेवर धरले. यावेळी बंगे यांनी बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करताना नेरूर-कवठी या रस्त्याच्या दुर्दशेबाबत प्रश्न उपस्थित केला. या रस्त्यासंदर्भात बांधकाम विभाग समर्पक उत्तरे देत नसून या विभागाने केलेली बांधकामेही निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले.
हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २ जून रोजी सायंकाळी पेशंट आणला असता तेथील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी आरोग्य कें द्र बंद करून निघून गेल्याचे दिसून आले. आरोग्य विभाग जनतेला हीच सेवा देत आहे काय, असा सवाल दीपक नारकर यांनी दिला.
हिर्लोक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आणि चालकही नाही, आॅक्सिजनची सोय नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याने याठिकाणी रुग्णवाहिका व चालक तसेच इतर सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणीही नारकर यांनी केली. यावेळी एमएसईबी, शिक्षण विभाग व एसटी विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सभापती व उपसभापती, संबंधित अधिकारी यांनी इतर पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता ३ लाख ७५ हजाराचे अंदाजपत्रक कोणत्या कामाचे काढले, असा प्रश्न बंगे यांनी उपस्थित केला. तेच या अंदाजपत्रकातून करण्यात येणाऱ्या अभ्यांगत कक्ष व इतर कामांचे नियोजन कसे करणार, याचा खुलासा करण्याची मागणी के ली.
सभेच्या सुरुवातीस केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यूपीएससी परीक्षेत देशात १३२ वी आलेली कुडाळची प्राजक्ता ठाकूर, एसएससी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेली स्वरमयी सामंत व इतर विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)